बदलापूर : बदलापूर पोलीस ठाण्यात वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाने स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवून पोलीस खात्यात अधिकारी होण्याचा मान पटकावला आहे. ज्या खात्यात वाहनचालक म्हणून काम करीत होते, त्याच खात्यात मुलगा अधिकारी झाल्याने वडिलांची मान उंचावली आहे.
अक्षय चव्हाण हा बदलापूरच्या बेलवली भागात राहतो. अक्षयचे वडील रमेश हे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात चालकपदावर कार्यरत आहेत. अक्षयने त्याचे प्राथमिक शिक्षण बेलवली परिसरातील मराठी शाळेत पूर्ण करून पुढील शिक्षण बदलापूरच्या आदर्श शाळेसह उल्हासनगरच्या साकेत कॉलेजमधून एसएसस्सीची पदवी प्राप्त केली. मात्र, लहान बहीण आरतीप्रमाणेच शासकीय सेवेत उच्च पदावर काम करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने २०१७ पासून एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. ऐन परीक्षाकाळात कोरोना संकट आल्याने परीक्षा रद्द होईल आणि आपली मेहनत वाया जाईल, अशी चिंता त्याला सतावत होती. मात्र, त्याही काळात कुटुंबीयांनी खंबीर साथ दिली. दोन वर्षे दिवसरात्र अभ्यास करून अक्षयने २०१९ ला पहिल्यांदाच शासकीय सेवेची स्पर्धा परीक्षा देऊन घवघवीत यशही मिळवले.
बहिणीचे मिळाले मोलाचे मार्गदर्शन
अक्षयला संपूर्ण प्रवासात बहीण आरतीचे मोलाचे मार्गदर्शन होते. ती विक्रीकर निरीक्षक पदावर मीरा-भाईंदर येथे कार्यरत आहे. २०१० ला अक्षयने दिलेल्या परीक्षेत पोलीस निरीक्षक पदाच्या ४९६ जागा होत्या. त्यामध्ये एसटी कॅटेगिरीमधील २५ जागा पुरुषांसाठी होत्या. यामधून मेरिट लिस्टमध्ये ३४० पैकी २१७ मार्क मिळवून त्याने १३ वा क्रमांक मिळवला. अकरा महिन्यांचे पोलीस निरीक्षकपदाचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तो सेवेत रुजू होणार आहे. मात्र, सेवेत रुजू झाल्यानंतरही अभ्यास सुरू ठेवून राज्य सेवेतून डीवायएसपी होण्याचे स्वप्न त्याचे आहे.