मीरारोड - भाईंदर रेल्वे स्थानका जवळील बाजारात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या घाऊक भावात उघडपणे विक्री केली जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर अरेरावी करणाऱ्या विक्रेत्यास भाईंदर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्याची हवा लागताच विक्रेता गयावया करू लागला आणि त्याने ५ हजारांचा दंड सुद्धा भरला.
केंद्र आणि राज्य शासनाने बंदी करून सुद्धा मीरा भाईंदर मध्ये सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व वस्तूंची उघड उघड विक्री - वापर सुरु आहे. कारण महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, मुकादम, फेरीवाला पथक पासून पालिकेचे संबंधित अधिकारी - कर्मचारी यांचा वरदहस्त असल्याने बेधडकपणे बंदी असलेल्या पिशव्या आदींचा वापर सुरु आहे. एखाद्या जागरूक नागरिकाने तक्रार केल्यास वा बातमी आल्यास तेवढ्या पूर्ती कारवाई दाखवून पुन्हा प्लास्टिक पिशव्या आदींचे घाऊक विक्रेते व वापरकर्ते यांना मोकळे रान दिले जात आहे.
रविवारी सकाळी भाईंदर रेल्वे स्थानक जवळील बाजारात तर एक घाऊक प्लास्टिक पिशव्यांचा विक्रेता क्रेट व टेबल लावून उघडपणे पिशव्यांची पाकिटे विक्री करत होता. याची माहिती स्वच्छता निरीक्षक कांतीलाल बांगर यांना कळवल्या नंतर पालिकेचे पथक धावून आले.
दरम्यान तो विक्रीत पिशव्यांची पाकिटे सोडून पळून गेला होता. पालिका पथकाने ताब्यात घेतलेल्या पिशव्या त्याच्या एका साथीदार महिलेने पथकाचे दुर्लक्ष हेरून पळवून नेल्या. पथकाने त्या महिलेसह विक्रेत्याचा शोध सुरु केला. तो विक्रेता सापडला असता त्याने स्वतःचे नाव मुंदरम गुप्ता सांगत नालासोपारा येथून येत असल्याचे सांगितले. मात्र पथक सोबत अरेरावी करत दंड भरण्यास नकार दिल्याने त्याला भाईंदर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलीस ठाण्यात पोलिसांनी खाक्या दाखवताच बाहेर दांडगाई करणारा गुप्ता गुन्हा दाखल करू नका म्हणून गयावया करू लागला. अखेर त्याच्या परिचितांनी येऊन ५ हजारांचा दंड भरल्या नंतर त्याला समज देऊन सोडण्यात आले.