मीरारोड - अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या मागणी नंतर मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त यांनी कोस्टगार्ड ला पत्र पाठवून बेकायदा मासेमारी करणाऱ्या एलईडी व पर्ससीनसह कर्नाटकच्या घुसखोर बोटींवर कारवाई करण्यासाठी सहकार्य मागितले आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, सचिव संजय कोळी, सिंधुदुर्ग अध्यक्ष मिथुन मालंडकर रत्नागिरी अध्यक्ष खलील वस्ता व इतर पदाधिकारी आदींनी कोकण किनारपट्टी वरील मच्छीमार बंदरांचा दौरा केला होता.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये पर्ससीन व एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना डिसेंबर ते मे महिन्यात बंदी असताना १२ नोटीकल च्या आतील क्षेत्रात ते बेकायदेशीर मासेमारी करतात.
इतकेच नव्हे तर बेकायदा मासेमारी करणारे हे बोटवाले स्थानिक छोट्या व पारंपारिक मच्छीमारांना मात्र दादागिरी करून मासेमारी करण्यास मज्जाव करीत आहेत . शिवाय कर्नाटक राज्यातील मोठमोठ्या बोटी घोळक्याने महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग हद्दीत येऊन बेकायदा मासेमारी करत आहेत.
त्या बाबतच्या तक्रारी कृती समितीने मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्या कडे सातत्याने चालवल्या होत्या . त्यानंतर काही प्रमाणात कारवाईला सुरवात झाली . मात्र मत्स्य विभागाकडे कारवाई करण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने अडचण होत असल्याचे सातत्याने सांगण्यात येत होते.
कृती समिती ने अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणि त्यांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी नौदल किंवा कोस्ट गार्ड यांची मदत घेऊन कारवाई करा अशी मागणी पाटणे यांच्या कडे केली होती . त्या नुसार आयुक्त पाटणे यांनी कृती समितीची मागणी मान्य करत कॉस्टगार्डला लेखी पत्र देऊन अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास मत्स्य विभागास सहकार्य करण्यास सांगितले आहे अशी माहिती बर्नड डिमेलो यांनी दिली.