ठाणे: खासगी बसेसद्वारे गुजरातमधून बेकायदेशीरपणे ठाणे जिल्ह्यात मिठाईसाठी आणलेला ४५ लाख १७ हजार ७९८ रुपयांचा २२ हजार ८७९ किलो वजनाचा संशयित खवा तसेच माव्याचा साठा ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) तलासरी नाक्यावर जप्त केला. सुमारे ३६ तास चाललेल्या या कारवाईमधील दोन लाख ६६ हजारांचा एक हजार ३९५ किलोचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी दिली.
अनेक नियमांचे उल्लंघन करीत अस्वच्छ वातावरणात ही वाहतूक होत असल्यामुळे या कारवाईत ४२ नुमने तपासणीसाठी घेण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने मिष्टान्न विक्रेत्यांचे चांगलेच दाबे दणाणले आहेत. अन्न पदाथार्ंची बेकायदेशीरपणे व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी बसेसवरही जप्तीसारखी कारवाई केली जाणार असल्याचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी सांगितले.
दिवाळीत विषबाधा होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधून काही खासगी बसेसद्वारे ठाणे, मुंबईकडे खव्याची नियमांचे उल्लंघन करीत वाहतूक केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्याच आधारे १५ हून अधिक अन्न निरीक्षकांनी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान नाक्यावरून येणाऱ्या १२ खासगी प्रवासी बसेसवर ही कारवाई केली. संशयास्पद वाहने थांबवून त्यांच्या तपासणीमध्ये हा खव्याचा साठा जप्त केला. त्यापैकी एक हजार ३९५ किलो साठा नष्ट करण्यात आला.
१७ अधिकाऱ्यांचे पथक
अन्न व औषध विभागातील १७ निरीक्षकांसह दोन सहाय्यक आयुक्त आणि चार सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला हाेता. कर्मचाऱ्यांची कमतरता असतांनाही या विभागाने ही धाडसी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तलासरीतील या कारवाईत २२ हजार ८७९ किलो खव्याचा साठा जप्त केला. अशाच प्रकारे खासगी प्रवासी वाहतूकीतून अन्न पदाथार्ंची व्यावसायिक वाहतूक केल्यास यापुढे बसेसवरही कारवाई केली जाणार आहे. कुठेही अन्न पदाथार्ंमध्ये भेसळ आढळल्यास १८००२२२३६५ वर संपर्क साधावा - सुरेश देशमुख, सह आयुक्त , अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे