ठाणे: जादा परताव्याच्या अमिषाने विल्यम मस्कारेहन्स याच्यासह पाच जणांच्या टोळक्याने ठाण्यातील चंद्रकांत शेलार (५९) यांची पाच कोटी दोन लाख ४४ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी बुधवारी दिली.
आर. आर. एंटरप्रायजेसमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे बोलून विल्यम तसेच कुमगौडा पाटील, सविता मस्करेहन्स, रिमा मस्करेहन्स आणि पंकज गुप्ता अशा पाच जणांनी मिळून शेलार यांना विश्वासात घेऊन बोलण्यत गुंतविले. त्यानंतर त्यांनी शेलार यांना विविध कागदपत्रांवर सहया करण्यास भाग पाडले. त्यांच्या मालकीची ठाण्याच्या बाळकूम, ढोकाळी येील दहा एकर ३ गुंठे जमीन विक्रीच्या व्यवहारातून ती खरेदी करणारे ठाण्यातील जितेंद्र पाटील यांच्याकडून मिळालेल्या रकमेपैकी पाच कोटी दोन लाख ४४ हजार ही रक्कम त्यांच्या बँक खात्यातून आर. आर. एंटरप्रायजेस तसेच या चौघांच्या बँक खात्यावर वळते केले.
सदर सर्व प्रकार २८ फेब्रुवारी २०१२ ते २४ जुलै २०२२ या काळात घडला. त्यांनी २४ जुलै २०२२ रोजी विल्यम यांच्याकडे या पैशांची मागणी केली. तेंव्हा त्यांनी शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यानंतरही त्यांच्यापैकी कोणाकडेही त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी जादा परतावा किंवा मुळ रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विल्यम यांच्यासह पाच जणांविरुद्ध अपहार तसेच फसवणूकीचा गुन्हा ठाणे न्यायालयात दाखल केला. त्यानुसार ८ ऑगस्ट २०२३ रोजी याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झला आहे.