भिवंडी : १६ ऑक्टोबर रोजी भिवंडी तालुक्यातील २९ ग्रामपंचतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून त्यासाठी शासकीय निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गोरख फडतरे, आदर्श म्हात्रे यांच्यासह निवडणूक विभाग व या निवडणूक प्रक्रियेसाठी असलेले कर्मचारी यांनी निवडणुकीसाठी आवश्यक ईव्हीएम मशीन मंगळवारी निवडणूक उमेदवार अथवा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सीलबंद केल्या आहेत.
एकूण ३१ ग्रामपंचायतीं पैकी दुधनी व पिंपळघर या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य यांची बिनविरोध निवड झाल्याने तेथे निवडणूक होणार नाहीत. तर एकूण ३१ पैकी ६ सरपंच व एकूण २९७ सदस्यांपैकी ७४ सदस्य बिनविरोध निवडल्याने २२३ सदस्य यांच्यासाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ९८ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचारी असे ५४० कर्मचारी असलेले १०८ पथक असून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मंगळवारी या निवडणुकी साठी आवश्यक ९८ ईव्हीएम मशीन वऱ्हाळ माता मंगल कार्यालय या ठिकाणी उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सीलबंद करण्यात आल्या असून, ऐनवेळी ईव्हीएम मध्ये कोणता बिघाड झाल्यास १० मशीन राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.