कल्याण-कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. आक्षेपार्ह देखाव्यातील काही दृश्य आणि संवाद काढून मंडळ आता देखावा सादर करणार आहे. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी देखील मंडळास गणपती उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे.
विजय तरुण मंडळाने पक्ष निष्ठा या विषयावर देखावा साकारला होता. गणेश चतुर्थीच्या पहाटे पोलिसांनी हा देखावा जप्त केला आणि मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात मंडळाने मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय घेत पोलिस कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान मंडळ आणि पोलिस या दोघांची बाजू न्यायालयाने एकून घेतली.
या बाबत कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले की, मंडळाच्या देखाव्यातील आक्षेपार्ह दृश्य आणि संवाद काढून टाकण्याचे मंडळाने उच्च न्यायालयात मान्य केले आहे. आत्ता आक्षेपार्ह दृश्य आणि संवाद काढून देखावा सादर करता येणार आहे. पोलिसांकडूनही गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी सशर्त आहे. मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेनेचे महागनर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, न्यायालयाने ज्या गोष्टी काढण्याचे सूचित केले. ते मंडळाने मान्य केले आहे. मंडळ उद्या शनिवारपासून देखावा सादर करणार आहे.