प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : बंगला, मसिडीझची स्वप्ने तर माझीही आहेत परंतू समाजातील बेघरांची घरे झाली तर त्याचा आनंद अधिक असेल. यासाठी गावी आम्ररस महोत्सव राबवून दरवर्षी चार ते पाच लाखांचा नफा अशा संस्थांना देत असल्याचे सांगितले. टीडीएस किती कट होईल? इन्कम टॅक्सला किती बरं पडेल ? यापेक्षा आपल्याला जेवढी करता येईल तेवढी मदत करावी. किंबहुना सर्वानीच आपल्या मिळकतीतील १० टक्के तरी समाजसेवेसाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत सुकन्या मोने यांची मुलाखत माधुरी ताम्हणे यांनी घेतली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी प्रास्ताविकपर मनोगत तर, आभार प्रदर्शन शरद पुरोहीत यांनी केले. सुकन्या यांनी मनोरंजन सृष्टीत साकारलेल्या तसेच आयुष्यात धिटाईने सामना केलेले प्रसंग दिलखुलासपणे श्रोत्यांसमोर उलगडले. आजपर्यंतच्या अभिनयाच्या प्रवासात सुकन्या यांना अनेक लहानमोठे अपघात झाले.
झुलवा करताना साताऱ्याला देवदासीचा संताप अनुभवला. देवदासी डोळे फोडायला आल्या होत्या. २१ - २२ व्या वर्षी स्टेजवर अपघात झाला, पुन्हा फिल्मसिटीमध्ये अख्खा सेट कोसळून, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा खांब अंगावर पडला होता. अर्धे शरीर अर्धांगिने लुळे पडले होते. पण तरीही त्या सर्व आघातातून आणि आजारातून कशा सावरल्या? अन अभिनयासाठी उभ्या राहिल्या, त्याची कहाणी श्रोत्यांसमोर मांडताना या सगळ्याचे श्रेय आपल्या आईला दिले. आईमुळेच समाजसेवेची आवड निर्माण झाली.
माणसाकडे माणूस म्हणून पहाण्यास आईने सांगितले. त्यानुसार,घरी येणाऱ्या गरजूंना नेहमी मदतीचा हात पुढे करतो. ज्यांच्यापर्यत कुणी पोहचत नाही, अशा एका कर्करुग्णांच्या संस्थेला, मानसिक रुग्णांचा संभाळ करणाऱ्या संस्थेला आणि गेवराई येथील संस्थेसोबत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या मुलांचे कुणी नाही त्यांचे पालकत्वही त्यांनी घेतले.या कामात पतीसह कन्येचाही सहभाग असल्याचे नमुद करताना आजुबाजूच्या अनेकजणांची मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.