मीरारोड - ईद निमित्त घरात बकरे आणले म्हणून धार्मिक स्वरूप देऊन तणाव निर्माण झालेल्या मीरारोडच्या जे पी नॉर्थ ह्या गृहसंकुलातल्या ४१ ते ५१ रहिवाश्यांवर महिलेच्या फिर्यादी नंतर बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाला होता . आता ६३ वर्षीय रहिवाशी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून त्या महिलेच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे दाखल करण्यात आला आहे .
संकुलातील एस्टेला इमारतीत राहणाऱ्या मोहसीन खान यांनी ईद निमित्त घरात बकरे आणून ठेवले होते . मंगळवारी रात्री रहिवाश्यांच्या जमावाने त्यांची गाडी जबरदस्तीने अडवून तपासणी केली . घरात ठेवलेला बकरा काढा सांगत मोहसीन ला धक्काबुक्की केली . त्यांची पत्नी यास्मिनचा हात धरून कपडे फाडले अश्या फिर्यादी वरून पोलिसांनी ४१ ते ५१ जणांवर दंगल , विनयभंग आदी बाबत गुन्हा दाखल केला .
मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटे पर्यंत बकरा घरात ठेवला म्हणून रहिवाशी मोठ्या संख्येने जमून हनुमान चालीसा म्हणत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना धक्काबुक्की रहिवाश्यांनी केली . धार्मिक तेढ तणावाचे वातावरण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
यास्मिन यांच्या फिर्यादी वरून बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाल्या ने रहिवाशी देखील काही धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यां सोबत पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा पर्यंत जमले . गुरुवारी पहाटे ६३ वर्षीय महिलेच्या तक्रारी वरून मोहसीन वर सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला आहे . दोन्ही गुन्ह्यांचा पोलीस तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज , व्हिडीओ पडताळले जात आहेत .