मीरारोड - तक्रारदार वकील असून त्यांचे अशील असलेले गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार ह्याने ५० लाखांची लाच मागितली. त्यातील १५ लाखांचा हप्ता घेताना गणेश वनवे ह्या पोलीस हवालदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मीरारोड मधून रंगेहाथ अटक केली आहे . तर निरीक्षक शेलार पसार झाला असून त्याला २०१५ साली सुद्धा ५० हजारांची लाच घेताना सावंतवाडी येथे पकडण्यात आले होते .
मुंबईच्या पारसी धोबीघाट भागात राहणारे मानव परदेशी यांच्या फिर्यादीवरून मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात २ डिसेम्बर रोजी दिनेश चव्हाण व अजय जबडे सह मारसेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर तसेच विकास अग्रवाल , दुर्गेश कुमार उर्फ प्रवेश कुमा, सुमन नंदलाल पाल व अंजुमन चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता . रोख रकमेच्या बदल्यात संस्था , कंपन्या हा करोडो रुपये देत असल्याचे आमिष दाखवून परदेशी यांच्या कडून १२ लाख रोख घेऊन त्याला आरटीजीएस द्वारे जास्त रक्कम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली गेली होती .
अशाच प्रकारे अन्य काही जणांची फसवणूक व फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने सदर गुन्हा हा आर्थिक गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आला होता . सदर गुन्ह्यातील एक पाहिजे आरोपी ला अटक न करण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी शेलार याने ५० लाखांची लाच मागितली होती . तडजोडी अंती ३५ लाखांवर मांडवली झाली . तक्रारदार हे आरोपीचे वकील असून त्यांनी या बद्दल ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केली .
यातील भाईंदर पोलीस ठाण्यात असलेला गणेश वनवे हा या प्रकरणात आरोपी व वकील मार्फत मध्यस्थी अर्थात दलाली करत असल्याने ३५ लाखां पैकी पहिला हप्ता १५ लाखांचा देण्याचे ठरले . या प्रकरणी ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर व सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील सह चव्हाण, पाटील, महाडिक, शिंदे ,भुजबळ, बर्गे यांच्या पथकाने १७ जानेवारीच्या रात्री उशीरा मीरारोड येथे सापळा रचला .
पोलिसांनी सापळा रचला असताना वनवे हा आला आणि त्याने तक्रारदार वकिला कडून १५ लाखांची रोख लाच घेतली . वनवे याने लाच स्वीकारत गाडीतून पळून जात असताना सापळा रचलेल्या पथकाने त्याला सुरभी कॉम्प्लेक्स जवळून अटक केली . वनवे हा भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत असला तरी तो सध्या रजेवर होता . या घटने नंतर महेंद्र शेलार हा पसार झाला आहे . मीरारोड पोलीस ठाण्यात शेलार व वनवे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या दोघांची सखोल चौकशी केल्यास लाचखोरीच्या आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे . पोलीस शेलार याचा शोध घेत आहेत .
``विशेष म्हणजे २०१५ साली महेंद्र शेलार हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक असताना त्याने एका गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी १ लाखांची मागणी केली होती . त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी युनिटने शेलार याला ५० हजारांची लाच घेताना पकडले होते .