प्रज्ञा म्हात्रेठाणे : ठाण्यात यंदा दहा थरांचा थरार पाहायला मिळणार, अशी अपेक्षा होती. मुंबई, ठाण्यातील अनेक गोविंदा मंडळांनी दहा थरांचा सराव केला होता. मात्र, नऊ थरांच्या पलीकडे एकाही गोविंदा मंडळाला मजल मारता आली नाही. संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि मनसे आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाचा दहा थर लावून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न फसला.
मनसे आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली. ही सलामी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दिली. जय जवान गोविंदा पथकाने संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात नऊ थरांची सलामी दिल्यानंतर मनसेने भगवती मैदानात आयोजित दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथक दहा थर रचणार असल्याने या पथकाची दहा थरांची सलामी पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
राज यांच्यासमोर हे थर रचणार असल्याचे आयोजकांनी ठरविले होते. राज यांचे आगमन झाल्यानंतर जय जवान गोविंदा पथकाने सुरुपवातीला नऊ थरांची सलामी दिली. त्यानंतर दहा थर रचण्याचा प्रयत्न केला पण तो पहिलाच प्रयत्न अयशस्वी झाला. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मनसेची पहिली दहीहंडी फोडण्याचा मान जय जवान गोविंदा पथकांना देण्यात आला. यावेळी राज यांच्या हस्ते या पथकाला चषक आणि रोख पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर तीन गोविंदा पथकांनी राज यांच्या समोर थर लावण्याचा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहास्तव राज यांनी थोडा वेळ थांबून या तिन्ही पथकांची सलामी पाहिली आणि त्यांचे कौतुकही केले.