- नितिन पंडीत
भिवंडी- दुरुस्ती कामासाठी मागील चार महिन्यांपासून बंद असलेला स्व. राजीव गांधी उड्डाणपूल दुरुस्ती नंतर पुन्हा एकदा वापरात आला असून बुधवारी महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला . यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख,उपमहापौर इम्रान वली खान,नगरसेवक हलीम अन्सारी,अर्षद अन्सारी शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते .
२००६मध्ये बनविण्यात आलेला स्व राजीव गांधी उड्डाणपूल ठेकेदाराने कमकुवत बनविल्याने २०१९ मध्ये उड्डाणपुलावर भगदाड पडले होते. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात आली होती. या पुलाचे परीक्षण व्हीजेटीआय संस्थेतील तज्ञांनी केल्या नंतर ही बाब समोर आली. त्यांनतर उड्डाणपुलावरील खड्डयांनी रस्त्याची चाळण झाली असताना पालिकेने मागणी केल्याने शासनाकडून ७ कोटी तर अतिरिक्त खर्च म्हणून मनपाने ३ कोटी रुपये असे सुमारे १० कोटी रुपये या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले आहेत.
उड्डाणपुलाच्या दुरुस्ती नंतर धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या मार्गावरील वाहनांची वाहतूक कोंडी तून सुटका होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली असून उड्डाणपूल सध्या हलक्या वाहनांसह दुचाकी वाहनांना खुला करण्यात आला असून तज्ञांचा सल्ला घेऊन त्याचे परीक्षण केल्या नंतरच उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे .
दरम्यान चार महिन्यां नंतर उड्डाणपूल खुला झाला परंतु अवजड वाहतूक सुरू होणार नसल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी तशीच राहणार असून स्व राजीव गांधी व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल हाईट बेरिकेटिंग लावून मोठ्या वाहनांसाठी बंदी घातल्याने या दोन्ही उड्डाणपुलाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला असल्याची प्रतिक्रिया नागरीकांमधून दिली जात आहे.