उल्हासनगर - संततधार पावसाने वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदी किनाऱ्यावरील भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधी नगर, हिराघाट, मातोश्रीनगर, राजीव गांधीनगर आदी ठिकाणी नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने, शेकडोचे संसार उघडयावर पडले. महापालिकेने नदी किनारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन बाधित शेकडो नागरिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे.
उल्हासनगर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रात्रभर संततधार पाऊस पडल्याने, सकाळ पासूनच भारतनगर, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, इमलीपाडा, हिराघाट, मातोश्रीनगर, राजीव गांधी नगर, करोतीयानगर परिसरात पुराचे पाणी घुसण्यास सुरवात झाली. नागरिकांनी हातात मिळेल ते सामान वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील कपडे, साहित्य व अन्नधान्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या शेकडो जणांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी पुराच्या पाण्याची पाहणी करून नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
वालधूनी नदी किनारा परिसरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर, सीएचएम कॉलेज, आम्रपाली शाळा, सेंट जोशेफ, ग्रँड गुरुकुल आदी अनेक शाळेत पुराचे पाणी घुसल्याने, शाळांना सुट्टी देण्यात आली. मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळेत पुराचे पाणी घुसून, शैक्षणिक साहित्यासह संगणक भिजून गेले. तसेच सतर्कता म्हणून पुरक्षेत्रातील वीजपुरवठा महावितरण विभागाने बंद केला. सी ब्लॉक, शहाड फाटक, राजीव गांधीनगर, आयटीआय कॉलेज, फर्निचर मार्केट, शांतीनगर आदी ठिकाणीही पाणी साचून पुरपरिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते.
धोकादायक घर जमीनदोस्त
कॅम्प नं-३ येथील पंजाबी कॉलनी येथील एक घर धोकादायक झाल्याची माहिती महापालिकेकडे आल्यावर, महापालिका अतिक्रमण पथकाने दुपारी घर जमीनदोस्त केले. अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच शहरातील घोषित धोकादायक इमारतीकडे महापालिकेचे लक्ष असल्याचे शिंपी म्हणाले.