ठाणे : जगात सगळ्यात वाईट गोष्ट कोणती असेल तर ती धर्म आणि राष्ट्रीयता आहे. धर्म, राष्ट्रीयतेच्या दुराग्रहामुळेच देशाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लेखकांनी सजगपणे त्याच्या पलीकडे जाऊन व्यक्त होत लिहिले पाहिजे, असे परखड मत ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या राज्यस्तरीय लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित प्रकट मुलाखतीत शंभू पाटील यांनी खुमासदार शैलीत नेमाडे यांना बोलते केले. यावेळी नेमाडे यांना लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, दिनकर गांगल, अशोक कोठावळे, साहित्यिक भारत सासणे, अपर्णा पाडगावकर, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर आणि लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा नेमाडे यांचाही सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. चंद्रकांत कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले.
आदिम काळात मानव जसा शिकारी होता, तसाच आजही आहे. आजही दर सेकंदाला कुठे ना कुठे बलात्कार, खून, मारामाऱ्या होत असतात. आरोपी वर्षानुवर्षे सापडत नाहीत, हेच आपले ‘अच्छे दिन’ आहेत, अशी उपरोधिक टिप्पणी करत नेमाडे यांनी धर्म, राष्ट्रीयतेवर नेमकेपणाने बोट ठेवले. लेखकांनी धर्म आणि राष्ट्रीयता न मानता सजगपणे लेखन करून ते थोपवायला हवे. लेखकांनी संपूर्ण आकलन झाल्याशिवाय लिहिण्याची अजिबात घाई करू नये, असा सल्लाही नेमाडे यांनी दिला.