ठाणे : घोडबंदर भागात शनिवारी रात्री एका व्यावसायिकाची कारमध्ये शिरुन हत्या करणाºया कर सल्लागार भूषण पाटील त्याचा साथिदार नितीन पाटील या दोघांना कासारवडली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून त्यांनी हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्या झाली तेव्हा भूषण पाटील हा त्या व्यवसायिकासोबत कारमध्ये सोबत होता. संशय येऊ नये म्हणून त्याने हल्लेखोरांकडून स्वत:वर देखील हल्ला करवून घेतला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यात आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्यानेच कासारवडवली पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली होती.
हत्या झालेल्यांचे नाव सतीश पाटील असे असून ते पेशाने व्यावसायिक असून ते वर्तकनगर येथील देवदयानगर परिसरात राहतात. शनिवारी रात्री सतीश हे त्यांच्या कारने ओवळा भागात आले होते. त्यावेळी कारमध्ये भूषण आणि नितीन होता. काहीवेळाने भूषण याने मोटार चालविण्यास घेतली. ओवळा येथील विहंग व्हॅली चौकात आले असता, भूषण हे कामानिमित्ताने गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी दुचाकीवरून दोनजण त्याठिकाणी आले. त्यांनी सतीश यांची कारमध्ये शिरून धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली.
हल्लेखोरांनी भूषण यांच्या हातावर देखील वार केले. नितीन हा त्याठिकाणाहून पळून गेला. याप्रकरणी भूषण याने तक्रार दाखल केल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कासारवडवली पोलिसांचे पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भूषण याची कसून चौकशी केली असता, त्याने दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून सतीश यांची हत्येची सुपारी दिल्याचे कबूल केले. तसेच संशय येऊ नये म्हणून हल्लेखोरांकडून स्वत:वरही वार करवून घेतले. त्यानंतर नितीन याला देखील ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कासरवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.