सदानंद नाईक -
उल्हासनगर - निर्वासिताचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमधील टाऊन हॉल येथे १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्यात आला. यावेळी फाळणी अनुभवलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणीला उजाळा देताच, जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांच्यासह उपस्थितांच्या अंगावरही शहारा उभा राहिला.
देशाच्या फाळणी वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तब्बल ९६ हजार निर्वासित नागरिकांना कल्याण शहरा जवळील ब्रिटिशकालीन लष्करी वसाहतीत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या निर्वासितांच्या वस्तीला उल्हासनगर हे नाव देण्यात आले. फाळणीची सर्वाधिक झाळ या नागरिकांना बसली. जमीन जुमला आणि आपले नातेवाईक सोडून हे लोक येथे आले होते. यांमध्ये सर्वाधिक लोक हे सिंधी समाजाचे होते. व्यवसायाभिमुख असलेल्या सिंधी समाजाने आज सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळविला. देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त १४ ऑगस्ट रोजी टाऊन हॉलमध्ये विभाजन विभाषिका दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ नागरिक व स्वातंत्र सेनानी यांचा जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
देशाच्या फाळणीचे थरारक क्षण येथील जेष्ठ नागरिक व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय सांगू लागताच सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला. जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांनी निर्वासित सिंधी समाजाचे कौतुक केले. कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त अजीज शेख, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार कोमल ठाकूर, आदी उपस्थित होते.
देशाची फाळणी झाली त्याचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावेळी भोगलेल्या वेदनांविषयी आताच्या पिढीला माहिती व्हावी. यासाठी अशा प्रकारचा स्मृती दिन पहिल्यांदाच देशात आणि राज्यात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले.
ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर येथे निर्वासीतांची संख्या जास्त असल्याने याठिकाणी हा कार्यक्रम घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वातंत्र्य चळवळीची चेतना जागविण्याचे काम अमृत महोत्सवाच्या माध्यमातून हेत असल्याचे सांगत उल्हासनगरमधील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी आमदार आयलानी यांनी मनोगत व्यक्त केले. फाळणीचा काळ अनुभवलेल्या देविदास जयसवानी आणि मीना रुपचंदानी यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी प्रास्ताविक केले