मीरारोड - एप्रिल महिन्यात ६ गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल केल्या बद्दल मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पुरस्कार देऊन कौतुक केले.
वसईच्या बंगली येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय किरण मगीया यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दुचाकीस्वार लुटारू चा तपास गुन्हे शाखा २ चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे व पथकाने केला . आंबिवलीच्या इराणी वस्ती मधून जोखीम पत्करून पोलिसांनी अब्बास इराणी (२४) ह्या आरोपीला अटक केली. त्याने केलेले एकूण १६ गुन्हे उघडकीस आणून ३ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्या बद्दल पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पोलीस पथकास देण्यात आले.
नालासोपाराच्या संकेत मोहिते याची दुचाकी कर्जाचे हप्ते थकले म्हणून बळजबरी काढून घेत ती विकल्या प्रकरणी नालासोपारा पोलीस व गुन्हे शाखा २ च्या पथकाने तपास करून पॉल नाडर , सलमान शेख व सुधांशु कनोजिया या तिघांना अटक केली. त्यांनी अश्या प्रकारे गुन्हे केलेल्या २१ लाख ४० हजार किमतीच्या तब्बल ३४ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या . नालासोपाराचे वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे आणि गुन्हे शाखा २ चे निरीक्षक शाहूराज रणवरे व पोलीस पथकास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम व पथकाने एका बंद टेम्पोतील २१ लाख ९१ हजरांचे मोबाईल व इलेक्ट्रिक साहित्य चोरल्या प्रकरणी गुजरात मधून विशाल राजभर याला अटक केली . त्याच्या कडून जवळपास सर्व मुद्देमाल हस्तगत केल्या बद्दल तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. माजी नगरसेवक व केबल व्यावसायिक यांच्या घरातून ७४ लाख ५० हजार रोख व १२ हजारांचे दागिने चोरणाऱ्या त्यांचाच सहकारी संजीवकुमार सिंह उर्फ नेताजी याला गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व पथकाने अटक करून सर्व रोख हस्तगत केली . त्या बद्दल स्पेशल रिवॉर्ड चे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले गेले.
एटीएम मध्ये मदतीच्या बहाण्याने लोकांना लुबाडणाऱ्या साहिल शेख व सागर मंडल याना अटक करून ६ गुन्हे उघडकीस आणत दुचाकी, दिड लाख जप्त केल्या बद्दल विरार गुन्हे शाखा ३ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व पथकास स्पेशल रिवॉर्ड २ चा पुरस्कार देण्यात आला. वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्ष कैलास बर्वे व पथकाने घरफोडींचे १० गुन्हे उघडकीस आणत महेश वेदक रा .वालीव व बद्रिआलम चौधरी रा . सातिवली याना शिताफीने अटक केली . त्यांच्या कडून ३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला . यासाठी स्पेशल रिवॉर्ड चे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्तांनी दिले.