- सुरेश लोखंडे
ठाणे : अलीकडेच देशातील वेगवेगळ्या राज्यांत निवडणुका होऊन आता सत्ता स्थापनेची लगीनघाई सुरू झाली आहे. सत्तेची खुर्ची मिळण्याआधीच स्वयंपाकाच्या किमतींत वाढ करून राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना महागाईच्या खाईत लोटले आहे. या गॅसची किंमत तब्बल ८९९.५० रुपये झाल्यामुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे त्यांच्यात सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
निवडणुकांचे पडघम वाजताच जीवनावश्यक वस्तूंसह गॅसदर व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी चतुराई सत्ताधा-यांकडून वेळोवेळी केली जाते. पण, निवडणुका संपताच व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढत असताना घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहेत. या आधीच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत दरमहा २५ रुपयांनी आणि ऑक्टोबरला १५ रुपयांनी जिल्ह्यातील हा स्वयंपाकाचा गॅस वाढलेला आहे.
१) किती ही महागाई?
महिना- गॅसचे दर-
जानेवारी २०२१- ६८४
ऑक्टोबर २०२१- ८९९.५०
मार्च २०२२- ८९९.५०
२. सबसिडी नावालाच - केंद्र शासनाने काही महिने केवळ नावाला सबसिडी लागू केली. मात्र, आता काही महिन्यांपासून आजपर्यंत बँक खात्यात तिची रक्कम जमा झालेली नाही. सरकारने सामान्य कुटुंबीयांना सबसिडीच्या नावाखाली तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळेही संताप आहे.
३) चूल पेटविता येईना, गॅस परवडेना - शहरी भागात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांना दरमहा घराचा हप्ता, तर काहींना घरभाडे जमविण्याची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्यातही या सोसायट्यांमध्ये हा महागडा गॅस वापरण्यास परवानगी आहे. चूल पेटवण्यास सक्त मनाई असल्यामुळे हा रहिवासी महागाईमुळे त्रस्त झाला आहे.
४) केवळ गॅससाठी हजार रुपये कसे परवडतील?
स्वयंपाकाचा गॅस सध्या परवडत नाही. त्यातही कमी गॅस मिळत असल्यामुळे तो महिन्याच्या आधीच संपलेला असल्यामुळे नवीन गॅस मिळणेही अवघड होत आहे. त्यात महागाईमुळे आम्हा गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.- दर्शना साळुंखे, दिवा
सतत वाढणाऱ्या गॅसच्या किमती कधी कमी होणार, याची वाट पाहिली जात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून गॅसच्या किमतीत झालेली वाढ कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आम्ही गृहिणी खर्चात काटकसर करून गॅससाठी पैसे राखून ठेवत आहे. वेतनात वाढ होत नसल्यामुळे आर्थिक समस्या येत आहेतच. त्यात गॅसची भाववाढ गृहिणींच्या समस्येत वाढ करणारी ठरली आहे.- सृष्टी कुलकर्णी, डोंबिवली