सदानंद नाईकउल्हासनगर : घरी आल्यानंतर बघते आईच्या या रागावण्याने घाबरलेल्या ११ वर्षाची मुलीगी घरातून लोकलने कर्जतला गेली. त्याच लोकलने परत मुंबईला जात असताना शेजारी बसलेल्या प्राध्यापिका शीतल बोलेटवार यांनी मुलीची चौकशी केल्यावर सर्वप्रकार लक्षात आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन पोलिसासमक्ष आई-वडिलांचा ताब्यात दिले.उल्हासनगर कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर मध्ये राहणाऱ्या राहुल सिरसाट यांना ११ वर्षाची खुशी नावाची मुलगी आहे. दोघेही कामावर जात असल्याने खुशी घरी राहते. मंगळवारी दुपारी २ वाजता आई हिचा खुशीला फोन आला. तेव्हा अज्ञात कारणावरून मला घरी येऊ दे. तुला बघून घेते. अशी आई रागविली. रात्री घरी आल्यानंतर आई मारेल या भीतीने खुशी हिने घर सोडून उल्हासनगर स्टेशनला गेली. त्यावेळी आलेल्या लोकलमध्ये बसून कर्जतला गेली. इकडे घरी खुशी घरी दिसली नसल्याने शोधाशोध सुरू झाली होती. कर्जतहून त्याच लोकलने ती मुंबईकडे जाण्यास निघाली. त्यावेळी प्राध्यापक असलेल्या शीतल बोलेटवार मैत्रिणीसह खिडकी शेजारी लोकलमध्ये बसल्या होत्या. खुशी हिने शीतल यांच्याकडे खिडकी शेजारी बसण्यासाठी विनंती केली. खिडकी शेजारी बसलेल्या खुशीची शितल यांनी चौकशी केली असता अंधेरी जात असल्याचे तिने सांगितले. मात्र, ही गाडी अंधेरीला जात नाही. असे खुशीला सांगितले. त्यांना संशय आल्यावर अधिक चौकशी केली असता खुशी रागाने घरातून पळून आल्याचे उघड झाले.प्राध्यापिका शीतल यांनी खुशीच्या शाळेचा फोन नंबर गुगलवरून मिळवून झालेला प्रकार सांगितला. तसेच तिच्या वडिलांचा नंबर घेऊन मुलीबाबत माहिती दिली. दुसरीकडे मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी मुलीचा शोध सुरू करून गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती दिली होती. मुलगी कर्जत गाडीने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने उघड झाले. त्यावेळी प्राध्यापिका शीतलसोबत खुशी असल्याचे सर्वांना समजताच सुटकेचा निश्वास सोडला. शीतल बोलेटवार यांनी खुशीला मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या स्वाधीन केल्यावर सर्वांनी शीतल यांच्यासह त्यांच्या सहकारी मैत्रिणीचे आभार मानले. तसेच खुशीला पोलिसांनी आई-वडिलांच्या ताब्यात दिले. आई-वडीलांनीही प्राध्यापिका शीतल यांचे आभार मानले. यावेळी जागरूक प्राध्यापिकेमुळे ११ वर्षाची मुलगी काही तासात मिळाल्याने सर्वांनी जागृत राहण्याचे आवाहन कड यांनी केले.
आई रागावल्याने मुलगी लोकलने कर्जतला गेली, प्राध्यापिकेच्या जागरूकतेमुळे सुखरूप घरी परतली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 7:01 PM