ठाणे : गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकत्यां शिक्षकांची बदली करण्यात येवू नये किंवा याचिकाकत्यांच्या बदलीस स्थगिती देण्यासाठी न्यायालयाचे निर्देश आहेत. या न्यायप्रविष्ठ शिक्षकांना वगळता अन्य शिक्षकांना शासनाने २४ फेब्रुवारीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे आदेश जारी झाले आहेत. त्यामुळे या शिक्षकांच्या बदलीच्या हालचाली ठाणे जिल्हा परिषदेत जोर धरू लागल्या आहेत .
शासनाच्या शिक्षण विभागाने निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हांतर्गत बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे आॅनलाईन पध्दतीने करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यामुळे न्याय प्रविष्ठ शिक्षक वगळता बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या बदलीच्या शाळेवर हजर होण्यासाठी आता जिल्हा परिषदेला या शिक्षकांना कार्यमुक्त करावे लागणार आहे. तसे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहे. या आदेशामुळे बदली झालेल्या शेकडो शिक्षकांना ऐन सुटीच्या कालावधीत बदलीने मिळालेल्या शाळेचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहे.
या बदली झालेल्या शिक्षकाच्या कार्यमुक्तीतून मात्र जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकत्यांची बदली करण्यात येवू नये किंवा याचिकाकत्यांच्या बदलीस स्थगिती देण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत, असे शिक्षक वगळण्यात आलेले आहे. अन्य शिक्षकांची आता सुटीतच कार्यमुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शिक्षकांना शासनाने दिलेल्या २४ फेबु्रवारीच्या पत्रातील निदेर्शानुसार कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे आदेश शासनाच्या उपसचिवाकडून जिल्हा परिषदेला जारी झालेले आहे. त्यानुसार आता कारवाईचा बडगा उगारून शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.