ठाणे : ठाणे महापालिकेने आता शहरातील अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. त्यात ४७ शाळा या अनाधिकृत असल्याचे पालिकेने सांगितले. त्यानुसार या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नका अशी सुचना देखील महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्यातही या ४७ शाळांमध्ये तब्बल ४२ शाळा या इंग्रजी माध्यमाच्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच हिंदी माध्यमाच्या ३ आणि मराठी माध्यमाच्या दोन शाळांचाही समावेश आहे.
शाळा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेला शासनाची मान्यता आहे का हे पडताळून न पाहता, पालक प्रवेश घेत असतात. कालंतराने त्या शाळेला शासनाची मान्यता नसल्याचे समोर आल्यानंतर पालकांची फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. शिक्षण हक्क कायदयातील कलम १८ नुसार कोणतीही शाळा संबंधीत शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्याता, ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करता येत नाही, असे नमुद केले आहे.
कायदयाच्या कलम १८ (५) अन्वये राज्य मंडळाशी संलग्नित शाळांकरीता राज्यशासनाचे परवानगी आदेश व सीबीएससी, अयसीएससी, आयबी, आयजीसीएसई, सीआयई आदी मंडळाशी संलग्नित शाळांकरीता राज्यशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र या आदेशाशिवाय शाळा सूरु असल्यास अशा शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार नुकतेच ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या ३७ शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली असून या शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यामतून नोटीसा बजाविण्यात आल्या. आता ठाणे पालिका क्षेत्रात देखील ४७ शाळा ह्या अनधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
ठाणे महापलिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा, दिवा या भागांमध्ये अनधिकृत शाळांची जत्राच भरली असल्याचे दिसून येत आहे. तर, घोडबंदर रोड, बाळकुम या भागांमध्ये देखील अनधिकृत शाळा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या भागांमध्ये अनधिकृतपणे सुरु असलेल्या ४७ शाळांपैकी सर्वाधिक इंग्रजी मध्यामच्या ४२ शाळांचा तर, हिदी माध्यमाच्या ३ आणि मराठी मध्यामच्या दोन शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या अनधिकृत शालंवर पालिका प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
अनधिकृत शाळांना तीन नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच दंडात्मक कारवाईची नोटीस देखील बजाविण्यात आली आहे. तसेच शाळांच्या दर्शनीभागात शाळा अनधिकृत असल्याचे फलक लावण्यात आले असून पोलीस आयुक्तांना देखील पत्र दिले आहे. त्यानुसार कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. - बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी, ठामपा