मीरारोड - शहरातील झाडांचा पडणारा पाला पाचोळा , झाडांच्या लहान फांद्या आदी पासून मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून जळाऊ विटा तयार केल्या जात असून लवकरच त्याची क्षमता वाढवण्यात येऊन त्याच्या पासून पालिकेला आता नियमित उत्पन्न सुद्धा मिळणार आहे .
मीरा भाईंदर महापालिकेची शहरात उद्याने , मैदाने आहेत , या शिवाय विविध इमारती व कार्यालये असून त्या ठिकाणी लहान मोठी झाडे मोठ्या संख्येने आहेत . या शिवाय शहरातील सार्वजनिक रस्त्यावर झाडे आहेत . ह्या झाडांच्या छाटणी दरम्यान लहान मोठ्या फांद्या व पाला निघतो . सार्वजनिक ठिकाणी वा खाजगी ठिकाणी असलेली झाडे पावसाळ्यात पडण्याच्या घटना घडतात . तसेच विकासकामात बाधा ठरतात म्हणून , घोकादायक म्हणून देखील मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात त्यावेळी त्यातून मोठ्या प्रमाणात झाडांचा पाला पाचोळा , फांद्या निघतात . नारळाच्या झावळ्या पडत असतात.
ह्या आधी सदर झाडांचा पालापाचोळा , लहान फांद्या ह्या एखाद्या मोकळ्या भूखंडावर बेकायदा टाकला जात होता . तो सुकला कि त्याला आगी लावल्या जात होत्या . अश्या काही प्रकरणात पालिकेच्या अधिकारी - कर्मचारी यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे . तर झाडांचा हा पाला - फांद्या उत्तन येथील डम्पिंगच्या ठिकाणी सुद्धा टाकला जातो . ह्या झाडांच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने अखेर गांभीर्याने घेत त्यावर प्रक्रिया करण्या बाबत विचार सुरु केला .
ह्या झाडांच्या पाला पाचोळा व लहान फांद्यां पासून खत तसेच जळाऊ विटा बनवण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी सुमारे सव्वा वर्षां पूर्वी घोडबंदर येथील पालिका बस डेपो मागील जागेत प्रकल्प सुरु केला होता . सिरो एनर्जी ह्या कंपनीने सुमारे ५ टन क्षमतेचा प्रकल्प उभारला होता व त्यालाच प्रायोगिक तत्वावर ६ महिने साठी चालवण्यास दिला होता .
परंतु ६ महिन्यांची मुदत संपल्या नंतर मात्र नवीन ठेकेदार नेमण्या अभावी हा प्रकल्प बंद पडला होता . आयुक्त संजय काटकर यांनी झाडांच्या पाला पाचोळा व फांद्या वरील प्रक्रिया करणाऱ्या ह्या प्रकल्पाचा आढावा घेऊन निविदा प्रक्रिया करत महिन्याभरा पूर्वी सदर प्रकल्प नाशिकच्या अक्षता बायो मास्क फ्युएल ब्रिकेट या कंपनीस चालवण्यास दिला आहे .
या ठिकाणी पालिकेने दिलेल्या मोकळ्या जागेत झाडांचा ओला सुका कचरा आणून गोळा केला जात आहे . पूर्वी प्रमाणे मोकळ्या भूखंडात झाडांचा कचरा गोळा करण्याचे काम जवळपास बंद झाले आहे . रोज सुमारे १० ते १२ टन इतका झाडांचा कचरा निघत असतो . सदर कंपनीनेने तीन पाळ्या मध्ये प्रकल्प चालवून रोज सुमारे १० टन पाला पाचोळा व लहान फांद्यांवर प्रक्रिया करून त्या पासून जळाऊ विटा तयार करत आहे . सुक्या फांद्या , पाला हे क्रश केले जाते व नंतर साच्यात त्याच्या विटा तयार केल्या जातात. तर हिरव्या पानां पासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे . जळाऊ विटा तयार करून त्या विविध कंपन्या आदींच्या बॉयलर साठी पुरवल्या जात आहेत . तर पानांचे कंपोस्ट खत तयार केले जात आहे .
अनिकेत मनोरकर ( अतिरिक्त आयुक्त , मीरा भाईंदर महापालिका ) - झाडांच्या पाने व लहान फांद्यांवर प्रक्रिया करून जळाऊ विटा आणि कंपोस्ट खत तयार केले जात असून ठेकेदार कंपनी हि स्वतः प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी नवीन यंत्रणा बसवणार आहे . जळाऊ विटाच्या प्रति टन मागे १ हजार ८०० रुपये तर कंपोस्ट खत च्या प्रति टन मागे १ हजार ८ रुपये रॉयल्टी पालिकेला मिळणार आहे . त्यामुळे शहरातील झाडांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सुटून पालिकेला त्या पासून नियमित उत्पन्न मिळणार आहे .