मीरारोड - वरसावे येथील खाडी वर बांधला जाणाऱ्या नवीन पुलास तो सुरू होण्याआधीच तडे गेल्याचा आणि त्याच्या गर्डरची संरचना चुकीची असल्याचा आरोप खासदार राजेंद्र गावित यांनी बुधवारी पुलाच्या पाहणी वेळी केला . तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मात्र नवीन पद्धतीची संरचना असल्याचेच सांगत कामा दरम्यान स्ट्रेचमुळे किरकोळ पडलेले तडे भरले जातात असे सांगण्यात आले.
केदनराच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खाडीवरील ह्यानवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. सदर नवीन पूल फेब्रुवारी अखेर सुरू करण्याचे प्रयत्न प्राधिकरणाचे आहेत. मात्र बुधवारी खासदार गावित यांनी प्राधिकरणाच्या तसेच वाहतूक पोलीस अधिकारी आदींसह नवीन पुलाची पाहणी केली.
खा. गावित यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नवीन पुलाच्या बांधकामास गेलेले तडे तसेच गर्डरची संरचना दाखवून विचारणा केली. गर्डर चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पूल भरधाव वाहनांच्या भाराने धोकादायक होऊन कमकुवत होणार असल्याचे खा. गावित म्हणाले. त्यातच पुलाचे आयुष्य केवळ ५० वर्ष असल्याबद्दल सुद्धा त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
काशीमीरा ते तलासरी दरम्यान महामार्गावर असणाऱ्या ब्लॅक स्पॉटबाबत चर्चा करून अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दंड आकारणी यंत्रणेचे कॅमेरे लावावेत. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून रुग्णवाहिका ठिकठिकाणी उपलब्ध कराव्यात तसेच अग्निशामक दलाची एक गाडी तैनात ठेवावी अशा सूचना खा. गावित यांनी केल्या.
प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मुकुंद अत्तरडे यांनी पुलाच्या गर्डर संरचनेत दोष नसून ती नवीन पद्धतीने बसवले आहेत. बांधकामाचे दरम्यान स्ट्रेच येऊन किरकोळ तडे येतात ते भरले जाणार आहेत असे सांगितले. खासदारांच्या सुचणे नुसार तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करून त्याचा अहवाल दिला जाईल असे त्यांनी आश्वस्त केल्याचे खा. गावित म्हणाले. यावेळी मीरा भाईंदर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रमेश भामे, पोलीस व प्राधिकरणाचे अधिकारी, संपूर्णानंद गावंड आदी उपस्थित होते.