भिवंडी: काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली, असे वक्तव्य केले होते. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे भिवंडीतील राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर भिवंडीतील जलदगती न्यायालयात शनिवारी सुनावणी होऊन या दाव्याची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला होणार असल्याचे न्यायाधीशांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले.
भिवंडी न्यायालयामध्ये शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे तर्फे ऍड गणेश धारगळकर यांनी बाजू मांडली,तर खासदार राहुल गांधी यांच्या वतीने ऍड नारायण अय्यर यांनी बाजू मांडली.सोमवारी गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की,खासदार राहुल गांधींनी सुनावणीसाठी केलेल्या वैयक्तिक हजेरीतून सूट देण्याच्या अर्जाला न्यायालयाने परवानगी दिली आहे,मात्र गांधी यांनी मागितलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी युक्तिवाद केला जाईल अशी माहिती ऍड नारायण अय्यर यांनी दिली आहे.