बदलापूर: नगर परिषद शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतात बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी. परंतू कुळगाव बदलापूर नगर परिषदेने मात्र हे चित्र पालटले आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या ज्युवेली शाळेची पटसंख्या तब्बल पाचशे पार झाली असून एवढी मोठी पटसंख्या असलेली तालुक्यातील नगर परिषदेची ही एकमेव शाळा ठरली आहे.
गेल्या काही वर्षात इंगजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व नगर पालिका शाळांमधील घासरत चाललेला विद्यार्थी पट वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शासनानेही यादृष्टीने अनेक प्रयत्न केले आहेत, मात्र तरीही अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद व नगर पालिका शाळांमधील चित्र फारसे समाधानकारक नाही. परंतु कुळगाव बदलापूर नगर परिषदेने मात्र हे चित्र बदलून आशेचा नवा किरण दाखवला आहे. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या पूर्वेकडील ज्युवेली शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग भरत असून, या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही ५०० पार गेलेली आहे. शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावल्यामुळेच ही पटसंख्या वाढली आहे. यासाठी या शाळेचे मुख्याध्यापक शोभा पाटील व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी केलेले प्रमाणिक प्रयत्न आहेतच. पण त्याचबरोबर मुख्याधिकारी योगेश गोडसे, उपमुख्याधिकारी विलास जड्ये यांचेही मोलाचे योगदान आहे.
केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे. तर क्रीडा, कला आणि विविध स्पर्धा परीक्षामध्येही विद्यार्थ्यांनी तरबेज व्हावे यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात आले.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
''नगर परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमाच्या व इतर खाजगी शाळांच्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी नगर परिषद प्रशासनाने व शिक्षकांनी विशेष भर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत झाली. - योगेश गोडसे,मुख्याधिकारी, बदलापूर
''सातत्याने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे व सेमी इंग्रजी माध्यमही असल्याने बहुसंख्य पालक आमच्या शाळेकडे वळत आहेत. - शोभा पाटील