उल्हासनगर : शहर भाजपातील आक्रमक चेहरा असलेल्या प्रदीप रामचंदानी यांची शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड झाली. बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून रामचंदानी यांची ओळख आहे. शहरजिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आमदार कुमार आयलानी, प्रकाश माखिजा, महेश सुखरामनी, जमनू पुरस्वानी आदी नावाची चर्चा होती.
उल्हासनगर भाजप म्हणजे व्यापाऱ्यांचा पक्ष असे आरोप-प्रत्यारोप विरोधी पक्षाकडून नेहमी होतो. मात्र याला प्रदीप रामचंदानी हे अपवाद आहेत. ३ वर्षांपूर्वी राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर, शहरात भाजप व शिवसेना एकमेका समोर उभे ठाकले होते. त्यावेळी भाजपकडून प्रदीप रामचंदानी हे एकाएकी झुंज देत होते. याचा परिणाम शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रदीप रामचंदानी यांच्या चेहऱ्याला काळे फासून मारहाण केली होती. याप्रकरणी शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जेंव्हा कधी भाजपवर टीका होते. त्यावेळी सर्वप्रथम रामचंदानी पुढे असल्याचे चित्र शहरात आहे. सध्याच्या राजकीय परिस्थिती मध्ये प्रदीप रामचंदानी व्यतिरिक्त आक्रमक चेहरा भाजपकडे नसल्याने, त्यांची शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस पदी राहिलेले प्रदीप रामचंदानी दोन वेळा स्विकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले. शहर भाजपात गटतट नसल्याचे बोलले जात असलेतरी, प्रदीप रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांच्यातून विस्तव जात नाही. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टर्सला, १०५ कुठे व ५५ आमदार कुठे? असा भला मोठा पोस्टर्स लावून जाब देणाऱ्या प्रदीप रामचंदानी यांचे वरिष्ठ स्तरावरून कौतुक झाले होते. शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, माजी आमदार पप्पु कलानी यांच्या विरोधात बिनधास्त भिडणारा चेहरा म्हणजे प्रदीप रामचंदानी असे समीकरण शहरात झाले आहे. भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलीतरी, महापालिका बांधकाम विभागातून फाईल चोरल्या प्रकरणी त्यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांनी जेलची वारी खावी लागली आहे.
आमदार कुमार आयलानी यांना धक्का?
उल्हासनगरात साडे चार लाख पेक्षा जास्त मतदार असून शहर हे उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विभागले आहे. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष पदी जमनू पुरस्वानी तर आता प्रदीप रामचंदानी यांची शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड झाली. दोन्ही नेते आयलानी समर्थक नसल्याचे बोलले जाते.