सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: केंद्रपुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम (२०२२-२७) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीपासून हाती घेण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात ही या अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. निरक्षणांचा शाेध घेऊन त्यांचे सर्वेक्षण घराेघरी जावून करावे लागणार आहे. त्यांसाठी संबंधीत शहरांसह गांवातील शिक्षकांवर ही जाबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी आज एकत्र येऊन या अभियानाच्या सर्वेक्षणाच्या कामास विराेध दर्शवून तसे लेखी निवेदन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले, असे शिक्षक सेनेचे पदाधिकारी चिंतामण वेखंडे यांनी लाेकमतला सांगितले.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून शासनामार्फत देशामध्ये एकूण ९ साक्षरता मोहिमा राबविण्यात आल्या. भारतात २ ऑक्टोबर १९७८ रोजी केंद्र शासनाने राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम घोषीत केला आणि त्याची अंमलबजावणी सन १९७९ पासून सुरु झाली. विविध कारणामुळे सर्व निरक्षर साक्षरतेच्या प्रवाहात आले नाही किंवा त्यांना आणता आले नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार देशात प्रौढ निरक्षरांची संख्या २५ कोटी ७८ लक्ष एवढी होती. आजही देशात १८ कोटी निरक्षर व्यक्ती आहेत. महाराष्ट्रामध्ये १५ व त्या वरील वयोगटातील १ कोटी ६३ लाख निरक्षर व्यक्ती असल्याचे २०११ च्या जनगणनेतून निदर्शनास आले आहे. या निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना साक्षर करण्याचे काम शिक्षकांकउून करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील या शिक्षकांनी त्यास विराेध केला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार २०३० पर्यंत १०० टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट प्राप्त करावयाचे आहे. यासाठी केंद्र शासनाने राज्यांच्या मदतीने नव भारत साक्षरता कार्यक्रम एप्रिल २०२२ पासून सुरु केला आहे, तो मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. जागतिकीकरणाची आव्हाने पेलणारा भारतीय नागरिक तयार व्हावा या उद्देशाने सर्वांसाठी शिक्षण (प्रौढ शिक्षण) अंतर्गत वाचन, लेखन व संख्याज्ञान या मुलभूत कौशल्याशिवाय त्याहूनही पुढे आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजीटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण इत्यादी कौशल्ये व साक्षरता या मध्ये अंतर्भूत आहे.