ठाणे : नोकरीसाठी कामावर ठेवणाऱ्या मालकीनीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्या मालकीनीचे अश्लिल फोटो, व्हिडीओ डिलिट करण्यासाठी तिच्याकडे खंडणीची मागणी करत ती स्विकारणाऱ्या गुजरात, सुरत येथील विशालभाई लक्ष्मणभाई राठोड (४१) अशा टेलर असलेल्या नोकराला ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासात करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्हयात वापरलेला मोबाईल, धमकी देण्यासाठी वापरलेली सिमकार्ड, खंडणीची रक्कम आदी ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
तक्रारदार पीडित महिलेने ४ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीत, त्यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावरून प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली आहे. त्याला कंटाळल्याचे म्हटले. त्यानुसार श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तक्रारीत त्यांना ते फोटो आणि व्हिडीओ प्रसारित न करण्यासाठी त्यांच्यासह त्यांचे कुटुंबाकडे वेळोवेळी खंडणीची मागणी करून आजपर्यंत एक लाख १० हजार रूपये दिल्याचे म्हटले. तसेच हे प्रकरण कायमस्वरूपी मिटवुन ते अश्लिल व्हिडीओ व फोटो डिलीट करण्यासाठी पुन्हा ५० हजार रूपये खंडणीची मागणी अटकेतील विशाल राठोड नामक टेलर असलेल्या नोकराने केल्याचे नमूद केले आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दोन विशे पथकांची नियुक्ती करून त्याचा शोध सुरू केला. याच दरम्यान विशाल राठोड हा मुलुंड येथील पाच रस्ता या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाली. त्याच वेळी त्याने तक्रारदारांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून ३० हजारांच्या खंडणीची मागणी केली. तसेच ती रक्कम घेवुन मुलुंड पाच रस्ता येथील एका हॉटेलमध्ये बोलावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून त्याला खंडणीच्या रकमेसह मंगळवारी सायंकाळी रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल शेळके, सहायक फौजदार माणिक इंगळे, पोलीस हवालदार सुनिल माने, चंद्रकांत संकपाळ, पोलीस अंमलदार, निलेश धुत्रे, निलेश शेडगे, या पथकाने केली.
खंडणीखोर वेस्टन डिझाईनरतक्रारदार यांनी खंडणीखोर हा लेडीज टेलर तसेच तो वेस्टन डिझाईन बनवण्यामध्ये पारंगत असल्याने कामावर ठेवले होते. तो त्यांच्या दुकानात दोन वर्षापासुन काम करत होता. दरम्यान हळूहळू त्याने तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याशी जवळीक साधली. त्यातून खंडणीखोराने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यातून त्याने काढलेले फोटो आणि व्हिडिओ माध्यमातून खंडणी मागण्यास सुरुवात केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.