नालासोपारा (मंगेश कराळे) :- घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. या आरोपीकडून पोलिसांनी २२८ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण १२ लाख २२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले आहे. आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल केली असून ५७ गुन्हे याआधी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी गुरुवारी दिली आहे.
शास्त्रीनगरच्या सिल्व्हर सॅन्ड सोसायटीत राहणाऱ्या माधवराव वाडीकर (५०) यांच्या घरी १५ एप्रिलला दुपारी घरफोडी झाली आहे. चोरट्याने घराच्या किचनमधील खिडकीचे लोखंडी ग्रील कशाचे सहाय्याने तोडून काचेचे स्लाईडिंग सरकवून त्यावाटे घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला आहे. माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना आजूबाजूच्या सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याद्वारे आरोपीचा मागोवा घेऊन आरोपीचे वर्णन प्राप्त करून आतिष साखरकर (३६) याला वसईतून ताब्यात घेऊन अटक केले आहे. आरोपीकडे विचारपूस केल्यावर त्याने बोरिवली व विलेपार्ले परिसरात अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल करून त्याच्याकडून ११ लाख ४४ हजार ५५० रुपयांचे २२८ ग्रॅम सोने, ३ मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १२ लाख २२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, प्रविण कांदे, गोविंद लवटे, आनंदा गडदे, पुजा कांबळे, भालचंद्र बागुल, अमोल बर्डे यांनी केली आहे.