ठाणे: समाजात प्रभाव पाडण्यासाठी थेट सहायक पोलीस आयुक्तांची वर्दी परिधान करुन पोलीस अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या वैभव राऊत या ४१ वर्षीय तोतयाला चितळसर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी रविवारी दिली. विशेष म्हणजे त्याचा पेहराव इतका हुबेहूब होता की, तो दूसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी असल्याचा समज झाल्याने चितळसर पोलिसांनी आधी त्याला कडक सॅल्यूट ठोकला. नंतर चौकशीत तो तोतया असल्याचे उघड झाल्यानंतर मात्र त्याला अटक केली.
राऊत याच्याकडून पोलिसांनी विविध प्रशासकीय पदांची बनावट ओळखपत्र जप्त केली आहे. तो मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी आहे. २६ सप्टेंबर रोजी ठाण्यातील घोडबंदर भागातील द सिक्रेट या उपहागृहाजवळ आला. त्यावेळी त्याने पोलिसांचे मानचिन्ह असलेली सहाय्यक पोलीस आयुक्त पदाची खाकी वर्दी परिधान केली होती.
उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला आपण मुंबई पोलिसात कार्यरत असल्याचीही त्याने बतावणी केली. तसेच उपहारगृहा बाहेरील गर्दी कमी करा अन्यथा दंड आकारण्यात येईल असेही त्याने व्यवस्थापकाला बजावले. त्याचवेळी तेथे हजर असणारे चितळसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्याला आधी सॅल्यूट केला. नंतर संपूर्ण चौकशी केल्यानंतर मात्र त्याची तोतयेगिरी उघड झाली. त्याच्या अंगझडतीत रेल्वे, सहायक पोलीस आयुक्त, ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभाग अधिकारी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांसारख्या पदांची बनावट ओळखपत्रे मिळाली. त्याने त्या आधारे कोणाची फसवणूक केली आहे का ? याचाही तपास केला जात आहे.