ठाणे :
दीड आणि सहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी ठाण्यासह जिल्हा सज्ज झाला आहे. मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर शुक्र वारी अनंत चतुर्थीला जिल्ह्यात विविध ठिकाणी बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. परंतु या दिवशी कोणत्याही स्वरुपाचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच शीघ्रकृती दल आणि एसआरपीएफच्या तुकडय़ा देखील ठिकठिकाणी सज्ज ठेवण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात ७४८ सार्वजनिक आणि ३४ हजार ६२३ घरगुती बाप्पांना निरोप दिला जाणार आहे.यंदा ठाणे शहरात गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर (हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहे. तसेच गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी(चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत.९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला ठाणे पोलीस आयुक्तालयातील ७४८ सार्वजनिक तर,३४ हजार ६२३ घरगुती बाप्पांना भावपूर्ण वातवरणात निरोप देण्यात येणार आहे. यावेळी कुठलही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच विसर्जन मार्गात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. तसेच संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.