ठाणे : खरी शिवसेना कोणाची यावरुन सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मात्र आता याच मुद्यावरुन ठाण्यातील वागळे इस्टेट भागात गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या देखाव्यावर सध्या सर्वाच्याच नजरा रोखल्या आहेत. याठिकाणी खरी शिवसेना कोणाची यावर आधारीत देखावा साकारण्यात आला असून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, दिघे यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इतिहास दाखविण्याबरोबर अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे यांच्यावर टिका देखील केल्याचे दिसत आहे.
या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद का स्वीकारले? या विषयीचा इतिहास या फितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिवसेना कशी होती आणि आता कशी आहे? आणि खरी शिवसेना कोणाची? हे देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी बरोबर शिवसेना का गेली होती? बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेची भूमिका कशी होती? त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका कशी होती? हे सगळे प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच या फितीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.या देखाव्याच्या माध्यमातून केवळ सत्य दाखवण्याचा प्रयन्त करण्यात आला असल्याचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे शिष्य असून खरे शिवसैनिक असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आपल्या सोबत घेत थेट शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात दंड थोपटले. त्यानंतर आम्ही शिवसैनिक असल्याचे सांगत भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषविले. मात्र यानंतर शिवसेना कोणाची? यावरून वाद निर्माण होऊन त्यासाठी न्यायालयीन लढाई देखील सुरू झाली. मात्र खरी शिवसेना कोणाची? हे जनतेला दाखवून देण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील भवानीनगर येथील सार्वजनिक मंडळाने खरी शिवसेना कोणाची? हे अधोरेखित करणारी ध्वनी चित्रफित सादर केली आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा तयार करण्यात आला असून सध्या हा देखावा सर्वांचाच चर्चेचा विषय झाला आहे.