ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘बीईंग मी’ या पारलिंगी समुदायाच्या (एलजीबीटीक्यूआयए) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत महाविद्यालयातील विविध विद्याशाखांतील १०० विद्यार्थ्यांनी ‘पारलिंगी समुदायाचे ऐतिहासिक संदर्भ’ आणि ‘पारलिंगी समुदायाने अनुभवलेल्या समस्या आणि आव्हाने’ या विषयांवर शोधनिबंध सादर केले. उत्कृष्ट शोधनिबंध सादरकर्त्यांमध्ये ‘शाळा आणि शैक्षणिक संस्थांमधील लैंगिक भेदभाव’ हा विषय मांडणाऱ्या हर्षदा दराडे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मंगळवारी आयोजित या परिषदेत राष्ट्रीयस्तरावर ११५ विद्यार्थी व २६ शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. द्वितीय क्रमांक प्रणाली रणशूर हिने पटकावला. तिने ‘अदृश्य ते असाधारण प्रवास’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. ‘पारलिंगी समुदायाचे आव्हान आणि समाजाकडून त्यांच्या अपेक्षा’ हा विषय सादर करणाऱ्या श्रुतिका आणि श्रुती देसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. लंडनहून आलेल्या स्वीकर रेनबो पालकांच्या प्रवक्त्या नीलाक्षी रॉय म्हणाल्या की, पालक आपल्या मुलांची ट्रान्स आयडेंटिटी स्वीकारत नाहीत. पालकांचा स्वीकार खूप महत्त्वाचा आहे.
ट्वीट फाउंडेशनच्या सहसंस्थापक सदस्य माया अवस्थी यांनी तृतीयपंथींना नोकरीची संधी समाजसंस्थांनी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. हमसफर ट्रस्टच्या ऊर्मी जाधव यांनी संशोधन उपक्रम, एचआयव्ही रुग्णांना दिलेली मदत आणि हमसफर ट्रस्टच्या इतर उपक्रमांबद्दल सांगितले. जीनिव्हा येथील सियामा बार्किन कुझमिन स्विस यांनी एलजीबीटी मुलांना शाळांमध्ये स्वीकारण्यासाठी आणि गुंडगिरी आणि भेदभाव थांबवण्यास शैक्षणिक संस्था चांगल्या प्रकारे कशी तयार आहेत, याबद्दल सांगितले. या परिषदेला रोसालिंड फ्रँकलिन युनिव्हर्सिटी शिकागो येथील प्राध्यापक आणि देसी रेनबो पॅरेंट्स ॲण्ड अँलीजचे सक्रिय सदस्य राहुल देशमुख यांसारख्या नामवंत व्यक्तींनी सहभाग नोंदवला.
जेनेसिस कॉस्मेटिक सर्जरीचे डॉ. आनंद जोशी, पुणे विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातील डॉ. साधना नातू, पश्चिम बंगालचे अविनाबा दत्ता, ॲड. राजेंद्र नलगे, ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक मारियो दा पेन्हा हे वक्ते भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून सहभागी होते. तेलंगणाकडून स्वीकार फाउंडेशनच्या मुकुंदा माला, दिल्लीतील लैंगिकविषयक संशोधक आणि ट्रेनर बिराजा, क्विअर इंकच्या संस्थापक शोभना कुमार, विविधता आणि समावेशन उत्साहीचे अक्षय त्यागी यांनीही विचार मांडले.