- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिक, वास्तुविशारद, बिल्डर यांच्या मध्ये जनजागृती होण्यासाठी रिजेन्सी अंटेलिया येथील क्लब मध्ये नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. मात्र त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची मागणी नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी महापालिका आयुक्ताकडे केली.
उल्हासनगरातील अनधिकृत बांधकामे नियमाधिन करण्यासाठी गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने अधिनियम मंजुर केला. तसेच याबाबत जीआर प्रसिद्ध झाल्यावर, अधिनियमाची माहिती नागरिक, विकासक आणि वास्तुिशारद यांना देण्यासाठी महापालिका नगररचनाकार विभागाने रिजेन्सी अंटेलिया येथील क्लब मध्ये कार्यशाळेचे आयोजन गेल्या आठवड्यात केले होते. कार्यशाळेत शहरातील नागरिक, विकासक, वास्तुविशारद आदींनी हजेरी लावली होती. आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, नगररचनाकार प्रकाश मुळे आदींनी बांधकामे नियमित करण्याच्या अधिनियमा बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यासाठी नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे मागणी केली आहे.
महापालिकेने बांधकामांना नोटिसा पाठवून बांधकामे नियमाधीन करण्याचे आवाहन करून अर्ज करण्यास सांगितले आहे. तसेच याबाबत माहितीसाठी कार्यशाळेचे आयोजन करून नागरिकांत जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका प्रभाग समिती निहाय्य तज्ञ समिती व विशेष समितीची स्थापना करून त्याद्वारे बांधकामे नियमित केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेने घेतलेल्या कार्यशाळेला वास्तुविशारद अमर जग्याशी, कमलेश सुतार, अतुल देशमुख, दुर्गेश राय, भूषण पाटील यांच्यासह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. शासनाच्या अनधिकृत बांधकामे नियमाधीन करण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी नागरिकांना केले. नियमाधीन वेळी आकारण्यात येणार दंड कमी असून जादा चटईक्षेत्र मिळणार असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे.नगररचनाकार विभागात अपुरा कर्मचारी वर्ग महापालिका नगररचनाकार विभागाने, अपुरा कर्मचारी वर्ग असतांना, बांधकामे परवान्यांतून गेल्या वर्षी ५५ कोटीचे उत्पन्न मिळून दिले. यावर्षीही नगररचनाकार विभागाकडून मोठया उत्पन्नाची अपेक्षा असून शासन अधिनियमानुसार बांधकामे नियमित करण्यासाठी पुरेशा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी आयुक्ताकडे केली