बदलापूर : येथील शाळेतील शैक्षणिक साहित्य तसेच वर्गाची नासधूस संतप्त जमावाने केल्याने शिशू वर्ग, प्ले ग्रुप पुढील किमान आठवडाभर बंद राहणार आहेत. अन्य वर्ग पुढील दोन दिवसात सुरू करू, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.
शाळेतील दुर्दैवी घटनेनंतर मंगळवारी संतप्त जमावाने शाळेची तोडफोड केली. त्यात शाळेचे प्रचंड नुकसान झाले असून, प्ले ग्रुपचे वर्ग पूर्णपणे नष्ट झाले. तेथील खेळणी, बाके, शैक्षणिक साहित्य, फळे, काचा, पंखे वगैरे वस्तू मोडून तोडून टाकल्या.
वर्गातील सामानाचीच नव्हे तर दारे, खिडक्यांचेही नुकसान केले. शिशू वर्ग पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागेल. अन्य इयत्तांचे वर्ग सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. बदलापूर शहरातील वातावरण शांत झाल्यावर पोलिस प्रशासनाचा सल्ला घेऊन शाळा सुरू करणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.
भविष्यात पालकांवर भुर्दंड वाढणार शाळेतील घटना संतापजनक असली, तरी पालकांनी व्यक्त केलेली तोडफोडीची प्रतिक्रिया ही भविष्यात पालकांवरील भुर्दंड वाढवणारी आहे. शाळेचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्याकरिता लागलीच नाही तरी भविष्यात कदाचित पुढील वर्षी शाळा फी वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळेचे नुकसान अखेरीस पालकांच्या खिशातून त्यांना भरून द्यावे लागणार आहे, असे मत काही पालकांनीच व्यक्त केले.