ठाणे :
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, येथे जगभरातून लोक येतात. मागील सहा महिन्यांत शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर आम्ही येथे अनेक विकासाची कामे केली. मुंबईकरांना खड्डेमुक्त प्रवास दिला जाणार आहे. परंतु, तुम्ही काय केले, याचा हिशेब आता जनता मागणार आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
काही लोक आरोप, टीका करीत असतात. मात्र, असे लोक नागरिकांना आवडत नाहीत. काम करणारे लोक नागरिकांना आवडतात. त्यामुळे तुम्ही टीका करीत राहा, आम्ही काम करीत राहू, असेही शिंदे म्हणाले.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आमच्याकडे चांगले गुण होते. मात्र, संधी दिली गेली नाही१ शिंदे म्हणाले की, आमच्याकडे चांगले गुण होते. मात्र, आम्हाला संधी दिली गेली नाही, आम्हाला सतत दाबण्याचा प्रयत्न झाला. आता संधी आली आणि आम्ही चमत्कार करून दाखविला. शिक्षक आमदार निवडणुकीत मागच्या वेळेस शिवसेनेची भाजपसोबत उघड युती नव्हती. मात्र, आतून तुमची युती होती, असा चिमटा शिंदे यांनी वामन म्हात्रे यांना काढला.
२ मात्र, आता आपली उघड युती आहे, त्यामुळे आपला विजय हा मोठा असणार आहे. शिक्षक हे आपले भविष्य घडवतात. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही शिक्षकच उमेदवार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा लवकरच मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
माझा पक्ष काटा काढतो- आठवलेशिवसेना-भाजप युती व्हावी ही बाळासाहेबांची इच्छा होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांना मीसुद्धा सांगितले होते, की काही तरी गडबड होईल, परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यांनी नको तेच केले आणि मग शिदे यांनीदेखील त्यांना जे नको होते, तेच केले. त्यांच्या मनात आधीपासून खदखद होती, ती बाहेर आली. माझा पक्ष छोटा आहे. मात्र, हाच पक्ष योग्यवेळी काटा काढण्याचे काम करीत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.