लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, येथे जगभरातून फिरायला लोक येत असतात. त्यामुळे मागील सहा महिन्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आल्यानंतर आम्ही येथे अनेक विकासाची कामे केली आहे, मुंबईकरांना खड्डेमुक्त प्रवास दिला जाणार आहे. परंतु तुम्ही काय केले, याचा हिशोब आता जनता मागणार आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. तर काही लोक हे आरोप करीत असतात, टिका करीत असतात. मात्र टिका करणारे लोक नागरीकांना आवडत नाहीत. तर काम करणारे लोक नागरीकांना आवडतात. त्यामुळे तुम्ही टिका करीत रहा आम्ही काम करत राहू अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमच्याकडे देखील चांगले गुण होते, मात्र आम्हाला संधी दिली गेली नाही, आम्हाला सतत दाबण्याचा प्रयत्न झाला. आता संधी आली आणि आम्ही चमत्कार करुन दाखवला असेही ते म्हणाले. शिक्षक आमदार निवडणुकीत मागच्या वेळेस युती नव्हती. मात्र आतून तुमची युती होती, असे सांगत त्यांनी वामन म्हात्रेंची शाळा घेतली. मात्र आता आपली उघड युती आहे, त्यामुळे आपला विजय हा मोठा असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षक हे आपले भविष्यातील घडी आहे, आणि विद्याथ्र्याना घडविण्याचे काम हे शिक्षक करीत असतो. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही शिक्षकच उमेदवार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा देखील लवकरच मार्गी लावला जाईल असेही त्यांनी सांगितले.
मागील सहा महिन्यात राज्याच्या विकासाच्या दृष्टीने पावले उचलली गेली आहे. समृध्दी महामार्गामुळे पुढील सहा महिन्यात ठाणो ते शिर्डी हा प्रवास अवघ्या दिड ते पावणो दोन तासात होणार आहे. विरार ते वर्सोवा असा सी लिंक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विकासाची अनेक कामे हाती घेतली आहेत. मात्र मागील अडीच वर्षात हाच विकास थांबला होता. परंतु आम्ही वाटेतील स्पीड ब्रेकर आता काढून टाकली आहेत. आता सर्वसामान्यांचे सरकार आले आहे, आपले सरकार आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना - भाजप युती व्हावी ही बाळासाहेबांची इच्छा होती, त्यानुसार उध्दव ठाकरे यांना मी सुध्दा सांगितले होते, की काही तरी गडबड होईल परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यांनी नको तेच केले आणि मग शिंदे यांनी देखील त्यांना जे नको होते, तेच केले. त्यांची ही आधीपासूनची खदखद होती, ती बाहेर आली. माझा पक्ष छोटो आहे, मात्र हाच पक्ष योग्य वेळी काटा काढण्याचे काम करीत आहे.(रामदास आठवले - केंद्रीय राज्यमंत्री)