अंबरनाथ -अंबरनाथ पंचायत समिती आणि तहसील कार्यालय ज्या प्रशासकीय इमारतीत आहे त्याच प्रशासकीयकीय इमारतीच्या परिसरात नवीन शिधा वाटप कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच पोस्ट ऑफिससाठी तळमजल्यावर कार्यालय उभारले जाणार आहे.
अंबरनाथच्या कल्याण बदलापूर रोडवर शास्त्री हिंदी विद्यालयाच्या शेजारीच पालिकेच्या वास्तुत रेशनिंग कार्यालय आणि पोस्ट ऑफिस आहे. या दोन्ही कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने त्यांना लवकरात लवकर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र अंबरनाथच्या शिधावाटप कार्यालयासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने हे कार्यालय अजूनही अडगळीत पडून आहे. तर दुसरीकडे पोस्ट ऑफिसची इमारत देखील धोकादायक झाल्याने त्यांना देखील स्थलांतरित करण्याची गरज होती. या प्रकरणी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावली होती. या बैठकीत दोन्ही कार्यालयांसाठी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मोकळ्या जागेत कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
तहसील कार्यालयाच्या पाठीमागे शिधा वाटप कार्यालय उभारले जाणार आहे तर तहसील कार्यालयाच्या पार्किंग झोनमध्ये पोस्ट कार्यालय उभारले जाणार आहे. या दोन्ही जागांची पाहणी शनिवारी आमदार किणीकर यांनी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कशा स्वरूपात कार्यालय उभारता येईल याची माहिती घेतली. पोस्ट ऑफिस हे आमदार निधीतून उभारले जाणार असून शिधावाटप कार्यालयाचा प्रस्ताव तयार करून तो आर्थिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. हे दोन्ही कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस असल्याचे आमदार कीणकर यांनी स्पष्ट केले आहे.