उल्हासनगर : प्राचिन अंबरनाथ शिवमंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरस्ती महापालिकेने महाशिवरात्री पूर्वी केली. एमएमआरडीए अंतर्गत नेताजी ते कैलास कॉलनी रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु असूनही रस्त्याचे काम अर्धवट आहे. मात्र आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आक्रमक भूमिकेने रस्ता चकाचक झाला आहे.
उल्हासनगरातील मुख्य ७ रस्त्याचे काम १५० कोटीच्या निधीतून एमएमआरडीएच्या माध्यमातून होत आहे. रस्त्याच्या वर्कऑर्डरची मुदत संपून बराच काळ लोटल्यानंतरही रस्त्याचे काम अर्धवट आहे. नेताजी चौक ते कैलास कॉलनी हा रस्ता अंबरनाथ येथील प्राचिन शिवमंदिरकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची दुरस्ती करण्याची मागणी मनसेसह अन्य राजकीय नेत्यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे केली होती. आयुक्तानी सबंधित ठेकेदाराला अर्धवट काम प्रकरणी नोटीसा काढून रस्ता दुरस्ती केली. तसेच महाशिवरात्री निमित्त यात्रेकरून सुखसुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले आहे.
नेताजी चौक ते कैलास कॉलनी या रस्त्याची दुरस्ती महाशिवरात्री पूर्वी केल्याने, भाविकानी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमुख व शहराध्यक्ष संजय घुगे यांनी एमएमआरडीएचे मुख्याभियंता धनंजय चामलवार व अभियंता अमोल जाधव यांच्यासह महापालिकेकडे रस्त्याच्या दुरस्तीबाबत पाठपुरावा केला होता.