अंबरनाथ: कल्याण बदलापूर रस्त्यावरील ऑर्डनन्स फॅक्टरीकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर जो कॉंक्रीटचा थर टाकण्यात आला होता त्या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अनेक वाहन चालक या खड्ड्यात पडून अपघातग्रस्त झाले होते. त्यातच रेल्वे रूळ वरती आल्याने त्याचा देखील त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत होता. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने या ठिकाणांच्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
कल्याण - बदलापूर राज्य महामार्गाचे काम करीत असताना ऑर्डनन्स फॅक्टरीच्या प्रवेशद्वारासमोर रेल्वे रूळ जात होते. या रेल्वे रुळावरून ऑर्डर फॅक्टरीमधील शस्त्र निर्मितीसाठी लागणारे साहित्य देशभरात पोचवले जात होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे मालगाडीचा वापर बंद झाल्याने हे रूळ पडीक अवस्थेत होते. मात्र कल्याण बदलापूर रस्त्याचे काम करताना रूळ काढण्याची परवानगी न मिळाल्याने आहेत्या परिस्थितीत रेल्वे रुळावरच काँक्रीटचा थर टाकण्यात आला होता.
तर काही ठिकाणी पेवर ब्लॉक लावण्यात आले होते. मात्र रेल्वे रुळावर काँक्रीटचा थर योग्य रीतीने न टाकल्याने त्या ठिकाणचे काँक्रीट निघून हे रेल्वे रूळ अपघातास कारणीभूत ठरत होते. तसेच ज्या रेल्वे रुळावर पेपर ब्लॉक बसवण्यात आले होते ते पेपर ब्लॉक देखील निघाल्याने त्या ठिकाणी खड्डे पडले होते. त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत होता. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने त्या ठिकाणच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतला आहे.