नालासोपारा : पश्चिमेकडील हनुमाननगर परिसरातील एका इमारतीचे छत मंगळवारी रात्री कोसळल्याने घरातील चौघे जखमी झाले असून एकाची प्रकृती नाजूक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
नालासोपाऱ्याच्या हनुमाननगर परिसरात जय कृष्णा नावाची जुनी सोसायटी आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरामध्ये आठ जण झोपलेले असताना अचानक छत कोसळले. यात चौघे जखमी झाले असून प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रात्रीच तातडीने नायर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
आकांशा जाधव त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्या घरीच उपचार घेत आहेत. या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने पाच वर्षांपूर्वीच एका बांधकाम व्यावसायिकला पुनर्विकास करण्यासाठी सोसायटी देण्यात आली होती, पण अद्यापपर्यंत ही इमारत खाली न केल्याने ही घटना झाली असल्याचे स्थानिकांनी लोकमतला सांगितले.