अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : "महायुतीचा उमेदवार या मतदारसंघात उभा आहे. महायुती विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असून या मतदारसंघातूनच नव्हे तर सर्वच मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निवडून येतील," असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केला. ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
महायुतीचा धर्म या निवडणुकीमध्ये देखील पाळाला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नौपाडा, राम मारुती रोड या भागातून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही अंतरापर्यंत फडणवीस सामील झाले होते. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास केळकर यांनी घंटाळी देवीचे दर्शन घेतले. घंटाळीवरुन गोखले रोड मार्गे, जांभळीनाक्यावरुन पुढे टेंभी नाक्यावर दाखल झाले. येथे संजय केळकर यांनी आनंद आश्रमात जाऊन दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ही रॅली साडे बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. यावेळी ज्या ज्या भागातून ही रॅली गेली, त्या त्या भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. गडकरी रंगायतन परिसरातही कोंडीचे चित्र दिसून आले.
दरम्यान, "उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीतील सर्व मंडळी उपस्थित होते. त्यामुळे महायुतीचाच विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून मतदार राजा आर्शिवाद देईल हे निश्चित आहे," असं संजय केळकर यांनी म्हटलं आहे.