प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूसचा सिझन सुरू झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर आवाक्यात असले तरी ग्राहक मात्र फारसे नसल्याची चिंता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सध्या कोकणच्या हापूसबरोबर जागोजागीकर्नाटकचा आंबाही विकला जात आहे. हा दिसायला अस्सल हापूस सारखा असतो. कापून खाल्ल्यावरच त्याच्या चवीने तो ओळखता येतो. तोपर्यंत तो ओळखायला कठीण जाते. त्यामुळे ग्राहक हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा खरेदी करून फसत असल्याचे बागायतदारांनी सांगितले. त्यामुळे खात्रीशीर विक्रेत्यांकडूनच खरेदी करा, असे आवाहन हे कोकणातील बागायतदारांनी केले आहे.
१) आंबा नाजूक फळ, उकाडा वाढला की आंबा खराब होण्याचे प्रमाण वाढते. काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटा आल्यामुळे आंब्याचे देठ कमी झाले.
२) त्यामुळे पुढे येणाऱ्या आंब्याच्या आवकमध्ये घट होऊ शकते, असा अंदाज विक्रेत्यांनी नोंदविला आहे.
३) हापूस हा १५ मे नंतर स्वस्त होईल. त्यामुळे तो सर्वांना परवडणारा असेल.
आमच्याकडे ४०० ते १२०० रुपयांपर्यंत देवगड, रत्नागिरी हापूस मिळतो. यंदा आंबा स्वस्त; पण ग्राहक नाही, अशी परिस्थिती आहे. देवगडचा हापूस हा १० मेपर्यंत संंपेल आणि त्यानंतर रत्नागिरी, रायगड सुरू होईल; पण सध्या हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबे विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. - सचिन मोरे, बागायतदार
आमच्याकडे गेल्या वर्षी १,४०० रुपये डझनने असलेला हापूस यंदा ९०० ते १००० रुपये डझनपर्यंत विकला जात आहे; पण हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा हा २५० ते ३०० रुपये डझनने विकला जातो. तो स्वस्त मिळतो म्हणून ग्राहक त्याची खरेदी करतात आणि फसतात. - अनिकेत वालावलकर, बागायतदार
हापूसच्या नावाखाली, मद्रास, कर्नाटकचा माल विकला जातो. फार तर गंधावरून हा आंबा ओळखू शकतो; पण बाहेरून पाहिला तर तो कळत नाही.आंब्यामध्ये भरपूर रसायने वापरण्याचे प्रकारदेखील घडत आहेत आणि त्याचे साइड इफेक्ट शरीरावर नंतर दिसून येतात. आमच्याकडे देवगड हापूस २५० ग्रॅम : ८००-९०० तर १५०-२०० ग्रॅम : ७००-८०० रुपये डझन प्रमाणे आहे. - अमित आणि अनिता मोरे, आंबे विक्रेते