मीरारोड - भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्यास देण्याचा प्रयत्न हणून पाडू असा इशारा देत श्रमजीवी संघटनेने राज्य शासनाच्या निषेधार्थ आंदोलनास सुरवात केली आहे. २० फेब्रुवारी रोजी भीक मागो आंदोलन करून भीक मागून मागे जमलेला पैसा रुग्णालयासाठी शासनाला दिला जाणार आहे.
भाईंदर पश्चिमेस असलेले जोशी रुग्णालय हे पालिकेने बांधून शासनास दिले आहे. सदर रुग्णालयात अजूनही गंभीर स्वरूपाच्या आजारांवर शस्त्रक्रिया वा तातडीचे उपचार होत नाहीत. त्यातच शासना कडून वेळेवर डॉक्टर - कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात नाही. अनेक अडचणीं मुळे सदर रुग्णालयात सामान्य नागरिकांना अत्यावश्यक उपचार मोफत मिळत नाहीत.
आमदार गीता जैन यांनी नुकतीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कडे ठाणे पॅटर्न प्रमाणे सदर रुग्णालय वैद्यकीय संस्थेस देऊन सर्व नागरिकांना वैद्यकीय सुविधा मोफत देण्याची मागणी केली होती. आरोग्य मंत्री यांनी सुद्धा प्रस्तावावर विचार करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमजीवी संघटनेने शासकीय रुग्णालय खाजगी संस्थेस रुग्णालय देण्यास विरोध केला आहे. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा स्नेहल दुबे - पंडित व कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहरामध्ये ६० ते ७० टक्के गरीब, कष्टकरी, मजूर आणि आदिवासी लोक रहात असल्याने त्यांना मोफत उपचारासाठी जोशी (टेंबा) रुग्णालयात यावे लागते. आता रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा घाट घालून गोर गरीब, मजूर आणि आदिवासी लोकांचा मोफत उपचाराचा अधिकार शासन हिरावून घेत आहे आसा आरोप संघटनेने केला आहे.
एखाद्या खाजगी ठेकेदाराच्या ताब्यात शासकीय रुग्णालय दिल्यास प्रत्येक उपचारासाठी आणि औषधासाठी गरिबांना पैसे द्यावे लागतील. गरिबांच्या हक्कासाठी शासनाच्या या कठोर निर्णया विरोधात आंदोलन करण्यात येईल. येत्या काळात श्रमजीवी संघटनेच्या वतीने लोकांच्या हक्कासाठी आणि शासनाच्या या कठोर निर्णया विरोधात जाहीर निषेध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याची सुरवात बुधवारी सायंकाळी मीरा गावठाण , महाजनवाडी येथून करण्यात आली. श्रमजीवी संघटनेच्या आदिवासी महिलांनी गावठाण भागात शासना विरुद्ध घोषणा देत निदर्शने केली. यावेळी स्थानिक महिला व आदिवासी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.