ठाणे : लोकमान्य पाडा नं. ३ या भागातील लाकडीपुलाजवळील नाल्यावर असलेल्या गाळ्याची भिंत पडल्याची घटना रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने गाळे बंद असल्याने कोणत्याही स्वरुपाची जिवीतहानी झाली नाही. मात्र या गाळ्याच्या बाजूला असलेले तीन गाळे देखील धोकादायक झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील चारही गाळे तोडण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री १.०२ वाजताच्या सुमारास लोकमान्य पाडा नं. ३ येथील लाकडी पुलाजवळील नाल्यावर असलेल्या अमित म्हात्रे यांच्या दुकानाच्या गाळ्याची भिंत नाल्यात पडल्याची घटना घडली. सुदैवाने रात्रीच्या सुमारास गाळे बंद असल्याने जिवीतहानी टळली आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी व इतर यंत्रणांनी धाव घेत, परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु ज्या गाळ्याची भिंत पडली होती. त्या गाळ्याच्या बाजूला असलेल्या इतर गाळयांची स्थिती देखील धोकादायक झाली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील चारही गाळे तोडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर नाल्यात पडलेले डेब्रीज आणि नाल्याच्या आजूबाजूला पडलेले डेब्रीज देखील काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान यापूर्वीच महापालिकेच्या माध्यमातून नाल्यावरील व नाल्या शेजारी असलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापही नाल्यावरील रहिवासी स्थलांतरीत झालेले दिसून आलेले नाही. त्यामुळे आता प्रभाग समिती निहाय सर्वच ठिकाणांच्या नाल्याशेजारील व नाल्यावरील बांधकामांचा सर्व्हे केला जाणार असून जे अतिधोकादायक स्थितीत असतील त्यांना स्थलांतरीत करण्याच्या सुचना देण्यात येतील अशी माहिती उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली. तरी देखील रहिवासी स्थलांतरीत झाले नाही तर महापालिका त्यांनी तेथून स्थलांतरीत करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.