लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : गेली दहा वर्षे माथेरानमध्ये प्रतीक्षेत असलेली ई-रिक्षा सेवा आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. यासाठीची सर्व तयारी नगरपालिका प्रशासनाने केली असून, दोन ते तीन दिवसांत या ई-रिक्षा दाखल होणार आहेत. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ही सेवा सुरू करणयात येणार असल्याचे माथेरान नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले.
या सेवेसाठीचे दरही निश्चित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना पाच रुपयांत माथेरानला जाता येणार आहे, तर नागरिक व पर्यटकांना ३५ रुपये भाडे आकारले जाणार आहे. दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड ते बाजारपेठ व पुढे विद्यार्थ्यांना सेंट झेवियर्स शाळेपर्यंतचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मुंबई व पुण्याजवळील थंड हवेचे व निसर्गसंपन्न ठिकाण म्हणून माथेरान पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहे. दरवर्षी दहा लाख पर्यटक येथे भेट देत असतात. यात परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी असते. माथेरान प्रदूषणमुक्त राहावे म्हणून ब्रिटिशकाळापासून येथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे घोडा व हातरिक्षा यांचा वाहतुकीसाठी वापर होत आहे. मात्र, याचा मोठा आर्थिक फटका पर्यटक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. माथेरानचे टॅक्सी स्टँड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिलांची प्रचंड दमछाक होते. आता ती थांबणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ई-रिक्षा सेवा सुरू होणार आहे.
आम्ही श्रमिक रिक्षा संघटनेच्या माध्यमातून माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू होण्यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्नशील होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनीही पाठपुरावा केल्याने ई-रिक्षाचे स्वप्न साकार होत आहे. - सुनील शिंदे, सचिव, श्रमिक रिक्षा संघटना, माथेरान