भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत २५४ पदांच्या भरतीसाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला असून लवकरच या पदांची भरती महापालिकेत होणार आहे. राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने बुधवारी त्या संदर्भातील अध्यादेश जारी केला असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.या भरतीमुळे मनपा अस्थापनांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार असून तब्बल १५ ते १७ वर्षानंतर राज्य शासनाने मनपात भरती संदर्भातील निर्णय घेतला असल्याने पालिका आस्थापनात आनंद व उत्सवाचे वातावरण पसरले आहे.
भिवंडी मनपा आस्थापनेवर ४३६३ पदे मंजूर असल्याचा मनपा प्रशासनाने शासना दिला होता.या भरती संदर्भात आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.भिवंडी महानगरपालिकेची स्थापना दिनांक १६ डिसेंम्बर २००१ रोजी झाली असून महानगरपालिका ही ड वर्ग गटात मोडते. महानगरपालिकेचे ५ प्रभाग समिती असून सन- २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ७ लाख ९ हजार ६६५ इतकी असली तरी आजमितीस शहरातील लोकसंख्येने दहा लाखांचा आकडा पार केला आहे.सन २००५ मध्ये मनपात कर्मचारी भरती करण्यात आली होती मात्र तेव्हापासून आतापर्यंत सुमारे १५ ते १७ वर्ष पालिकेत भरती नसल्याने मनपा आस्थापनेसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडला होता.
भिवंडी महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नवीन पदे निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती मात्र तिचा योग्य तसा पाठ पुरावा होत नव्हता आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हि मागणी लावून धरली असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपली मागणी मान्य केली त्यामुळे मनपा आस्थापनेवरील ताण निश्चितच कमी होणार आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.