संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक
कोरोना हा जगभर मृत्यूचे तांडव करणारा विषाणू भारतात व मुख्यत्वे ठाण्यात आला नसता तर कदाचित ठाणे व पालघर जिल्ह्यातील एक ते सव्वा कोटी लोकसंख्येला सुपरस्पेशालिटी रुग्णालय मिळाले नसते. ठाण्यातील एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय किंवा गोरगरीब व्यक्तीची प्रकृती अचानक खालावली तर त्याला मुंबईतील महापालिकेच्या केईएम, सायन रुग्णालयांचा किंवा जेजे हॉस्पिटलसारख्या सरकारी रुग्णालयांचाच आधार होता व आहे. ब्रिटिश काळात मुंबईतील आरोग्य व्यवस्थेची त्यांनी जी घडी बसवली त्यावरच मुंबई, ठाणे इतकेच काय ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची भिस्त आहे.शनिवारी ठाण्यातील जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्याचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. कोरोनाबरोबरच राज्याचे मुख्यमंत्रिपद ठाण्याकडे चालून आले हेही सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम जलद गतीने मार्गी लागण्याचे आणखी एक कारण आहे.
ठाण्यातील अगोदरचे जिल्हा रुग्णालय हे जेमतेम ३०० खाटांचे होते. रुग्णालयाची इमारत अत्यंत जुनी झाली होती. अनेक विभागांत दारुण अवस्था होती. यंत्रणांचा अभाव होता. याखेरीज ठाणे महापालिकेचे कळवा रुग्णालय आहे. तेथील परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ८० लाखांच्या घरात आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास असून, २४ लाखांपेक्षा जास्त वाहने ठाणे शहरात आहेत. याचा अर्थ माणसी एक वाहन आहे. ठाणे परिसरात रोज दुचाकी, चारचाकीचे अपघात घडतात. प्रवासी गंभीर जखमी होतात. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्याची सक्षम शासकीय आरोग्य यंत्रणा नाही. जखमी व्यक्तीला ठाणे ते मुंबई गर्दी व वाहतूक कोंडीच्या काळात घेऊन जाणे व त्याचा जीव वाचवणे जवळपास अशक्य आहे. ठाण्यात पंचतारांकित खासगी इस्पितळे आहेत. महागड्या वैद्यकीय सुविधा आहेत. परंतु त्या किमान २५ लाख व त्यापेक्षा जास्त रकमेचा मेडिकल इन्शुरन्स असलेल्यांना लखलाभ होतील, अशा चढ्या दराच्या आहेत. सामान्य माणसाची डिस्चार्ज घेताना लाखो रुपयांचे बिल दिल्याखेरीज सुटका होत नाही. मग, राजकीय नेत्यांना मध्यस्थी घालून सुटका करवून घ्यावी लागते. मरणाने सुटका झालेल्या जीवलगाचा मृतदेह अंत्यसंस्काराकरिता अशा महागड्या इस्पितळांकडून मिळवितानाही संघर्ष करावा लागतो.
११ आधुनिक आय.सी.यू
सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची दहा मजली इमारत सहा लाख ८१ हजार ३९७ चौरस फुटांच्या क्षेत्रफळावर उभी राहणार आहे.
१५ ऑपरेशन थिएटर
न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी वॉर्ड असतील.
ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा वेगवेगळ्या शहरांत अशी सुपरस्पेशालिटी रुग्णालये उभी राहिली तरच खासगी इस्पितळांची लुटमार थांबेल व सामान्यांना दिलासा लाभेल.