भिवंडी: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असून त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रभाग समिती क्रमांक ५ चे प्रभारी प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांना पालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी २३ सप्टेंबर रोजी निलंबनाची कारवाई केली होती.भोईर यांच्या निलंबन आदेशात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा ठपका मनपा आयुक्तांनी ठेवला होता.आयुक्तांच्या या निलंबन कारवाईमुळे भिवंडी मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. मात्र अवघ्या १३ दिवसांनी प्रभाग अधिकाऱ्यांची कोणतीही चौकशी न लावता निलंबित अधिकाऱ्यास पुन्हा सेवेत रुजू केल्याने सध्या मनपा आयुक्तांचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला आहे.
मूळ नियुक्ती लिपिक पदावर असलेल्या सुनील भोईर यांच्यावर प्रभाग अधिकारी पदाचा प्रभारी पदभार सोपविल्याने प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासीत करणेची जबाबदारी त्यांच्यावर होती.सौदागर मोहल्ला येथील आरसीसी वाढीव बांधकाम सुरू असल्याची तक्रार प्राप्त होऊन ही भोईर यांनी कारवाई करण्यात कसूर केला, तर कोटरगेट येथील आझाद मैदानासमोर लंबी चाळ येथे अनाधिकृतरित्या तळ अधिक एक मजली इमारत, कोटरगेट जैतूनपुरा येथील मोकळ्या जागेतील अनाधिकृत बांधकाम मिरॅकल मॉलच्या तळमजल्या खालील अनाधिकृत गाळ्यांचे बांधकामांवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन निष्कासनाची कारवाई करणे आवश्यक असतांना याबाबत त्यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर मनपा आयुक्त म्हसाळ यांनी २३ सप्टेंबर रोजी निलंबनाची कारवाई केली होती.मात्र ६ ऑक्टोबर रोजी अवघ्या १३ दिवसात भोईर यांना लेखी अंडरटेकिंगवर सुनील भोईर यांची त्याच ठिकाणी व त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.मनपा आयुक्तांच्या या दुटप्पी धोरणाची शहरात सर्वत्र चर्चा रंगली असून इतर कर्मचाऱ्यांना निलंबनानंतर एक ते दिड वर्ष निलंबित केले जाते मग भोईर यास अवघ्या १३ दिवसात कसे रुजू करून घेतले असा सवाल कामगार संघटना विचारत आहेत.
ज्या कामाचा ठपका ठेऊन सुनील भोईर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती ते काम भोईर दोन महिन्यात करणार असून त्याबाबत त्यांनी अंडरटेकिंग दिली असल्याने त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिली आहे. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची निलंबन आढावा समितीपुढे चोकशी होते तो अहवाल मनपा आयुक्तांसमोर गेल्या नंतर निलंबित कर्मचाऱ्याला सेवेत रुजू करून घ्यायचे कि नाही हे मनपा आयुक्त ठरवतात मात्र सुनील भोईर यांची कोणतीही चौकशी न करता त्यांना अवघ्या तेरा दिवसात त्याच पदावर केवळ अंडरटेकिंगवर हजर करून घेणे हे पूर्णतः चुकीचे असून यामुळे मनपा प्रशासनात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहणार नाही अशी प्रतिक्रिया लेबर फ्रंट कामगार युनियनचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी दिली आहे.