- सदानंद नाईक उल्हासनगर - अखेर...महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्याला हिरवा कंदील मिळाला असून बस खरेदीसाठी निविदा काढण्यात आल्या. एकून २० बसेस परिवहन विभागात दाखल होणार असून त्यासाठी ३० कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवा सन-२०१० साली खाजगी ठेकेदारा मार्फत महापालिकेने सुरू केली होती. नागरीकांचाही बस सेवेला उत्स्फूर्त पाठींबा मिळाला होता. मात्र महापालिका व ठेकेदार यांच्यात तिकीट दरवाढीवरून वाद झाला. अखेर ठेकेदाराने टप्प्याटप्प्याने परिवहन बस सेवा बंद केली. तेंव्हा पासून महापालिका परिवहन बस सेवा ठप्प पडली. महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे हे गेल्या दिड वर्षापासून परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. महापालिका २० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार असून त्यापैकी १० बसेस ३० सीटच्या लहान व १० बस मोठा असणार आहेत. १० बसेस एसीच्या असणार असल्याने, नागरिकांचा प्रवासही गारागार होणार आहे. आयुक्त अजीज शेख यांनी बस खरेदी करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून बस नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्तांनी दिली.
महापालिका अंतर्गत एकून पाच मार्गावर परीवहन बस सेवा सुरू होणार असून शहरा बाहेरही महापालिकेच्या बसेस धावणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना बसेसमुळे दिलासा मिळणार आहे. तसेच रिक्षाचालकांच्या मनमानीला प्रकाराला आळा बसणार असल्याचे बोलले जाते. महापालिका परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष नेत्यांचा आयुक्ताकडे आग्रह होता. आयुक्त अजीज शेख यांच्या आयुक्त पदाच्या कालावधीत अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. परिवहन बस खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध झाल्याने, महापालिकेसह नागरिकांना परिवहन बस सेवेचे वेध लागले. तसेच महापालिकेने बांधलेले २५० बेडचे रुग्णालय गेल्या दिड वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. रुग्णालयाचे उदघाटनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदींच्या हस्ते केव्हांही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच उल्हासनगरचे रुपडे बदलत असल्याचे बोलले जात आहे.